लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘आचरेकर सरांच्या नेट्समध्ये धडे गिरवताना आम्ही प्रवीण आमरेची फलंदाजी जवळून पाहिले. त्याच्या स्टायलिश क्रिकेट बूटवर आमचे लक्ष गेले. तेव्हा प्रवीणने म्हटले की, शतक झळकावलेस तर हे बूट मी तुला देईन. त्यानंतर मी शतक झळकावले आणि प्रवीणने मला त्याचे बूट दिले. हे माझ्या आयुष्यातील पहिले स्टायलिश क्रिकेट बूट होते, जे मी कधी विसरणार नाही,’ अशी आठवण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितले. तसेच, ‘भारत खेळ खेळणाऱ्यांचा देश बनला पाहिजे,’ असेही त्यांनी म्हटले.
चिन म्हणाले की, ‘आचरेकर सरांच्या नेट्समध्ये मी साधे कॅनव्हास शूज घालून खेळायचो. तेव्हा सरांनी माझा मोठा भाऊ अजितला सांगितले की, सचिनसाठी स्पाईस शूज घ्यावे लागतील. हे बूट कसे असतात मला माहीत नव्हते. त्यावेळी, प्रवीण आमरे भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून ऑस्ट्रेलियात खेळून आलेला. तेव्हा, आचरेकर सरांनी त्याची फलंदाजी पाहण्यास सांगितले होते. माझे लक्ष त्याच्या स्टायलिश क्रिकेट बुटांवर गेले. प्रवीणने सांगितले की, तू शतक मार, मग मी हे बूट तुला देईन. शतक ठोकल्यानंतर त्याच्याकडून बूट मागण्याची माझी हिम्मत होत नव्हती. पण, प्रवीणने स्वत:हून मला बूट दिले. हे माझे पहिले दर्जेदार क्रिकेट बूट होते आणि हे मी कधी विसरणार नाही.’