मुंबई - 'आचरेकर सरांच्या नेट्समध्ये धडे गिरवताना आम्ही प्रवीण आमरेची फलंदाजी जवळून पाहिले. त्याच्या स्टायलिश क्रिकेट बूटवर आमचे लक्ष गेले. तेव्हा प्रवीणने म्हटले की, शतक झळकावलेस तर हे बूट मी तुला देईन. त्यानंतर मी शतक झळकावले आणि प्रवीणने मला त्याचे बूट दिले. हे माझ्या आयुष्यातील पहिले स्टायलिश क्रिकेट बूट होते, जे मी कधी विसरणार नाही,' अशी आठवण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितले. तसेच, 'भारत खेळ खेळणाऱ्यांचा देश बनला पाहिजे,' असेही त्यांनी म्हटले.
सचिन म्हणाले की, 'आचरेकर सरांच्या नेट्समध्ये मी साधे कॅनव्हास शूज घालून खेळायचो. तेव्हा सरांनी माझा मोठा भाऊ अजितला सांगितले की, सचिनसाठी आर्क स्पाईस शूज घ्यावे लागतील. त्यावेळी हे बूट कसे असतात माहीत नव्हते. पण, या बुटांना शोलेमधील ठाकूरच्या खिळ्यांच्या बुटांप्रमाणे मोठमोठे खिळे असतात हे कळले. त्यावेळी, प्रवीण आमरे भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून ऑस्ट्रेलियात खेळून आलेला. तेव्हा, आचरेकर सरांनी त्याची फलंदाजी पाहण्यास सांगितले होते.' सचिन यांनी टेनेक्सयू कार्यक्रमामध्ये पुढे सांगितले की, 'त्यावेळी माझे लक्ष त्याच्या स्टायलिश क्रिकेट बुटांवर गेले. प्रवीणने सांगितले की, तू शतक मार, मग मी हे बूट तुला देईन. शतक ठोकल्यानंतर त्याच्याकडून बूट मागण्याची माझी हिम्मत होत नव्हती. पण, प्रवीणने स्वत:हून मला बूट दिले. माझ्या आयुष्यातील हे पहिले दर्जेदार क्रिकेट बूट होते आणि ही गोष्ट मी कधी विसरणार नाही. पुढे भारताकडून खेळतानाही अनेकदा हे बूट मी वापरले.'
क्रीडा संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने सचिन यांनी सांगितले की, 'आपला देश युवांचा आहे. पण, आपण खरंच युवा आणि तंदुरुस्त आहोत का? याचे उत्तर नाही असेच येईल. कारण, आपला देश आज मधुमेहाशी झुंजतोय. यासारख्या अनेक आजारांविरुद्ध आपल्याला लढायचे आहे. त्यामुळे आनंदासाठी आणि आरोग्यासाठी खेळले पाहिजे. कारण, प्रत्येकजण खेळाडू नाही बनू शकतो. आपला देश नक्कीच क्रीडाप्रेमी आहे, पण आता भारत खेळ खेळणारा देश बनला पाहिजे. यासाठी कोणताही एक खेळ प्रत्येकाने खेळला पाहिजे. खेळ कोणताही खेळा, पण खेळा.'