नवी दिल्ली : ‘२०२३ सालच्या आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभव अत्यंत निराशाजनक होता. असे वाटले होते की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे. त्यामुळे मी निवृत्तीचाही विचार केला होता,’ असे भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले. घरच्या मैदानावर झालेल्या या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वात भारताने सलग ९ सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती. मात्र, निर्णायक अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
एका कार्यक्रमात रोहित म्हणाला की, ‘एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यानंतर मी पूर्णपणे खचून गेलो होतो. मला वाटले की, आता हा खेळ खेळायचा नाही. कारण, त्याने माझ्याकडील सर्वकाही हिरावून घेतले आहे आणि माझ्याकडे काहीच उरलेले नाही. यातून सावरायला मला थोडा वेळ लागला. मी स्वतःला सतत आठवण करून देत होतो की, हीच ती गोष्ट आहे ज्यावर मी खऱ्या अर्थाने प्रेम करतो. या गोष्टीला मी इतक्या सहजपणे सोडू शकत नाही. हळूहळू मी सावरलो, माझी हरवलेली ऊर्जा परत मिळवली आणि मी पुन्हा मैदानात सक्रिय झालो.’
रोहित पुढे म्हणाला की, ‘त्या पराभवानंतर प्रत्येक जण निराश होता आणि नेमके काय घडले, यावर विश्वास बसत नव्हता. वैयक्तिकदृष्ट्या माझ्यासाठी तो काळ फार कठीण होता. कारण, त्या विश्वचषकासाठी मी माझे सर्वकाही पणाला लावले होते. केवळ दोन-तीन महिने आधीच नव्हे, तर २०२२ मध्ये कर्णधारपद स्वीकारल्यापासूनच मी त्याची तयारी करत होतो.’ भारतीय संघाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषविले होते. या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचेपर्यंत भारताने एकही सामना गमावला नव्हता.
...तरीही पराभवाच्या वेदना होत्याऑस्ट्रेलियाकडून अहमदाबादमध्ये झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवानंतर अवघ्या एका वर्षात, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या २०२४ सालचा टी-२० विश्वचषक पटकावला. परंतु तरीही नोव्हेंबर २०२३ मधील ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाची वेदना विसरणे सोपे नव्हते. रोहित म्हणाला की, ‘जेव्हा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही सर्वकाही पणाला लावता आणि अपेक्षित निकाल मिळत नाही, तेव्हा अशी प्रतिक्रिया येणे स्वाभाविक असते. माझ्यासोबतही तसेच झाले; पण मला हेही माहीत होते की आयुष्य येथेच संपत नाही.’
आता सांगणे सोपे; पण...या निराशेतून सावरणे आणि स्वतःला नव्याने तयार करणे माझ्यासाठी मोठा धडा होता. मला माहीत होते की, २०२४ मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे आणि आता मला पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करावे लागेल. आता हे सांगणे सोपे आहे; पण त्यावेळी ते अत्यंत कठीण होते. - रोहित शर्मा
२४ डिसेंबरपासून दिसेल 'रो-को'चा जलवादेशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमधील प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील २०२५-२६ च्या हंगामात रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडीही मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा ७ वर्षांनी तर विराट कोहली तब्बल १५ वर्षांनंतर या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या हंगामाची सुरुवात २४ डिसेंबरपासून होत आहे. विराट कोहली दिल्लीकडून तर रोहित शर्मा मुंबईच्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने वरिष्ठ खेळाडूंनी या स्पर्धेत किमान दोन सामने खेळण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे ही जोडी किमान दोन सामने तरी खेळताना दिसेल.
Web Summary : Rohit Sharma considered retirement after the 2023 World Cup defeat, feeling the game had taken everything. He overcame the disappointment, fueled by his love for cricket, and is now focused on the future, including the T20 World Cup.
Web Summary : 2023 विश्व कप में हार के बाद रोहित शर्मा ने संन्यास लेने पर विचार किया, उन्हें लगा कि खेल ने सब कुछ छीन लिया। क्रिकेट के प्रति अपने प्यार से प्रेरित होकर उन्होंने निराशा को दूर किया और अब टी20 विश्व कप सहित भविष्य पर ध्यान केंद्रित कर रहे हैं।