युवराज सिंग म्हणतो, रिषभ पंत हा टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार; सांगितलं त्यामागचं कारण! 

रिषभ पंतन स्वतःला टीम इंडियाचा मॅच विनर म्हणून सिद्ध केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्येही त्याच्या आक्रमक खेळाचे अनेकांनी कौतुक केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 05:24 PM2021-07-08T17:24:56+5:302021-07-08T17:25:23+5:30

I see Rishabh Pant as India’s future captain, he has a smart brain: Yuvraj Singh | युवराज सिंग म्हणतो, रिषभ पंत हा टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार; सांगितलं त्यामागचं कारण! 

युवराज सिंग म्हणतो, रिषभ पंत हा टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार; सांगितलं त्यामागचं कारण! 

Next

रिषभ पंतन स्वतःला टीम इंडियाचा मॅच विनर म्हणून सिद्ध केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्येही त्याच्या आक्रमक खेळाचे अनेकांनी कौतुक केलं. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर टीम इंडियात रिक्त झालेली यष्टिरक्षकाची जागा भरून काढणं हे फार आव्हानात्मक काम होतं, पण अडखळत्या सुरूवातीनंतर रिषभनं स्वतःचे नाणे खणखणीत वाजवलेच. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रिषभनं कांगारूंची धुलाई केली. त्यानंतर कसोटी क्रिकेटमधील फलंदाजीची परिभाषा त्यानं बदलली. रिषभच्या याच आक्रमकपणावर खूश झालेल्या युवराज सिंगनं त्याला टीम इंडियाचा भविष्याचा कर्णधार म्हणून जाहीर केले. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडूनं २००७ व २०११च्या वर्ल्ड कप विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. 

''रिषभ हा मला अॅडम गिलख्रिस्ट सारखा वाटतो, जो कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र बदलू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये मैदानावर येताच गिलख्रिस्ट सामना पालटून टाकायचा आणि रिषभही तेच करतोय. रिषभमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनण्याचे कौशल्य आहे. त्याच्याकडे चतुर डोकं आहे आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना त्याची प्रचिती साऱ्यांनाच आली. त्यामुळे भविष्यात लोकांनी त्याला टीम इंडियाचा कर्णधार म्हणून पाहण्यास हरकत नाही,''असे युवी म्हणाला.

रिषभच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स ऑन टॉप
आयपीएलपूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि त्यानं आयपीएलमधून माघार घेतली होती. त्याच्या गैरहजेरीत दिल्ली कॅपिटल्सनं कर्णधारपदाची जबाबदारी रिषभकडे सोपवली होती. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीनं ८ पैकी ६ सामने जिंकून गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. 

Web Title: I see Rishabh Pant as India’s future captain, he has a smart brain: Yuvraj Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app