Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्थान टिकवण्यासाठी खेळत नाही, वर्ल्ड कपसाठी निवड नाही झाली तर...; शार्दूल ठाकूरचं प्रामाणिक उत्तर 

IND vs WI ODI Series : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) दमदार कामगिरी करून वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाचे दरवाजे ठोठावले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:46 IST

Open in App

IND vs WI ODI Series : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) दमदार कामगिरी करून वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाचे दरवाजे ठोठावले आहेत. पण, संघातील स्थान टिकून रहावे यासाठी खेळण्यापेक्षा संघासाठी सातत्याने योगदान देत राहण्याचा मानस शार्दूलने बोलून दाखवला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात शार्दूलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या  २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताकडून सर्वाधिक ५० विकेट्स शार्दूलने घेतल्या आहेत. यंदा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप होणार आहे.  

''गेल्या ८-९ वर्षांपासून..." संजू सॅमसन झाला भावूक, टीम इंडियातील कारकिर्दीबद्दल केलं मोठं भाष्य 

''या मालिकेत ८ विकेट्स घेतल्याचा मला आनंदच आहे. एक खेळाडू म्हणून आम्ही वर्षानुवर्षे अशाच संधीची वाट पाहत असतो. काहीवेळा तुम्ही कामगिरी करून दाखवता, तर काहीवेळा अपयश येतं. आतापर्यंत ज्याज्या मालिका मी खेळलो, त्यातून माझा आत्मविश्वास वाढत गेलाय, कारण ती मालिका माझ्या अनुभवात भर टाकणारी ठरली आहे,''असे शार्दूल म्हणाला.

त्याने पुढे म्हटले की,''भारतीय संघात मी स्थान टिकून रहावे या उद्देशाने खेळत नाही. ती माझी मानसिकता नाही आणि मी तसा खेळाडूही नाही. जर वर्ल्ड कप स्पर्धेसाठी माझी निवड झाली नाही, तर तो निवड समितीचा निर्णय असेल. मी त्याबाबत काहीच करू शकत नाही. मी नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन आणि सामन्यातील परिस्थितीनुसार खेळेन.''

शार्दूल ठाकूर संघाला उपयुक्त विकेट्सच मिळवून देत नाही, तर तळाच्या क्रमांकावर फलंदाजीही करू शकतो. त्यामुळेच मागील दोन वर्षांत तो वन डे संघात सातत्याने खेळतोय. ''माझ्या माहितीनुसार मी एक वन डे मालिका खेळलेली नाही. श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत मी नव्हतो. त्या मालिकेत मला का निवडले गेले नाही, हे मलाही माहीत नाही. पण, मागील दोन वर्षांत मी अन्य वन डे मालिकेत संघाचा सदस्य होतो. माझ्याकडून टीमला काही अपेक्षा आहेत आणि त्यामुळेच मला संघात कायम ठेवले गेले आहे. संघाचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच मला संधी मिळतेय,''असेही शार्दूलने स्पष्ट केले.  

इथून प्रत्येक सामना हा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी महत्त्वाचा असल्याचे शार्दूल म्हणाला. ''वर्ल्ड कप स्पर्धा येत आहे आणि तोपर्यंत प्रत्येक सामना हा संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, या विभागात तुम्हाला तुमची कामगिरी कशी होतेय याची चाचपणी करता येणार आहे. त्याशिवाय संघ व्यवस्थापनाचंही तुमच्यावर लक्ष आहेच. ''

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशार्दुल ठाकूरवन डे वर्ल्ड कप
Open in App