ठळक मुद्देइंग्लंड टी-२० संघाचा कर्णधार इऑन मॉर्गनवर आयपीएल लिलावात बोली लागली नव्हती.आयसीसीनं मॉर्गनला वर्ल्ड इलेव्हन संघाचा कर्णधार बनवलं आहे.
दुबईः आयपीएलच्या या वर्षीच्या पर्वासाठी झालेल्या लिलावात देश-विदेशातील अनेक रथी-महारथी क्रिकेटपटूंवर बोली लागली नव्हती. त्यात इंग्लंड टी-२० संघाचा कर्णधार इऑन मॉर्गन हाही एक होता. पण, आयपीएल स्पर्धेतील मालकांनी नाकारलेल्या या क्रिकेटवीरावर आयसीसीनं मोठी जबाबदारी सोपवली आहे.
इऑन मॉर्गन हा खणखणीत फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएल स्पर्धेत हैदराबादकडून खेळताना त्याने चमकदार कामगिरी केली होती. तो संघाचा कर्णधारही राहिला होता. पण, गेल्या वर्षी पंजाब संघासाठी त्याला फार काही करता आलं नाही. त्यामुळे यंदाच्या लिलावात त्याला कुणीच भाव दिला नाही. स्वाभाविकच, अनेक क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आता भुवया उंचावण्याची वेळ आयपीएल मालकांची आहे. कारण, आयसीसीनं मॉर्गनला वर्ल्ड इलेव्हन संघाचा कर्णधार बनवलं आहे. ३१ मे रोजी त्याच्याच नेतृत्वाखाली जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा संघ वेस्ट इंडिजशी दोन हात करणार आहे.
इरमा आणि मारिया या दोन वादळांमुळे कॅरेबियन बेटांवरील दोन स्टेडियमचं मोठं नुकसान झालंय. ही स्टेडियम नव्याने बांधण्यासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशानं आयसीसी वर्ल्ड इलेव्हन विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात प्रदर्शनीय सामना खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकण्याचं मोठं आव्हान मॉर्गनवर असेल. कारण, २०१६च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विंडीजनं इग्लंडचाच पराभव करून जेतेपद पटकावलं होतं.