Join us  

मी आलोय म्हणजे, उद्याच आयपीएल जिंकून देऊ शकत नाही; हार्दिक पांड्या असं का म्हणतोय?

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परत येणे खूप चांगले आहे.  जिथून मी प्रवासाला सुरुवात केली, तिथे मी परत आलो आहे, असे हार्दिक म्हणाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:02 AM

Open in App

Mumbai Indians New Captain Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी मुंबई इंडियन्स नवा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. रोहित शर्माने पाच जेतेपद जिंकून मुंबई इंडियन्सला एका वेगळ्या उंचीवर बसवले आहे आणि हे सातत्य राखण्याचे दडपण हार्दिकवर आहे. 

Mumbai Indians ने कॅप्टन बनवल्यानंतर रोहितशी बोलण झालं का? हार्दिक म्हणाला.. 

हार्दिकने सोमवारी मुंबईत सीझनपूर्व पत्रकार परिषदेत सांगितले की, “मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परत येणे खूप चांगले आहे.  जिथून मी प्रवासाला सुरुवात केली, तिथे मी परत आलो आहे. ही एक अतिशय वास्तविक भावना आहे, कारण २०१५ पासून आतापर्यंत मला जे काही मिळाले ते या संघामुळे आहे. २०१५ मध्ये जेव्हा मी पदार्पण केले तेव्हा माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. मी येथे पोहोचलो आणि पहिल्या दिवसापासून माझ्या आवडत्या मैदानावर पुन्हा खेळलो याबद्दल मी खूप आभारी आहे.”

मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर आतापर्यंतच्या तयारीवर समाधानी होते आणि इंट्रा स्क्वॉड सराव सामने कसे पूर्ण होतात हे पाहण्यास उत्सुक आहेत. “आम्ही सध्या चांगल्या लयमध्ये आहोत. आमच्याकडे मोठे पथक आहे. आम्ही आज आमचा पहिला सराव सामना खेळणार आहोत. काही युवा खेळाडूंना संघात स्थान मिळवण्यासाठी चांगली कामगिरी करताना मी पाहत आहे आणि ही एक चांगली स्पर्धा आहे,” असे बाऊचर म्हणाले.  हार्दिकने MI मधील त्याच्या पुनरागमनाला घरवापसी म्हटले आणि सांगितले की कारकिर्दीच्या सुरुवातीला एक दिवस मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळेल याची त्याने कधीही कल्पना केली नव्हती. “परत आल्याने खूप छान वाटते. १० वर्षांनी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेन असे कधीच वाटले नव्हते. ही भावना अप्रतिम आहे.  पुढील हंगामासाठी आणि माझ्या जुन्या सहकाऱ्यांसोबत पुन्हा खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे.  आम्हाला एकत्र खूप यश मिळाले आहे,” असे पांड्या पुढे म्हणाला.

हार्दिकने  कर्णधारपदाचा मंत्र सांगितला तो म्हणजे,  ज्या गोष्टी नियंत्रित करता येतील त्यावर नियंत्रण राखण्याचे लक्ष्य केंद्रित करण्याचे. “तुम्ही प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.  मी उद्या आयपीएल जिंकू शकत नाही. हे फक्त काही महिन्यांतच होऊ शकते.  त्या दोन महिन्यांत आपण कशावर लक्ष केंद्रित करू शकतो, आपण तयारी कशी करतो, आपण एकमेकांची काळजी कशी घेतो, आपण एकमेकांना ओळखतो याची खात्री कशी करतो, हे महत्त्वाचे आहे. आम्ही फक्त एकच वचन देऊ शकतो की, आम्ही क्रिकेटचा एक ब्रँड खेळू ज्याचा सर्वांना आनंद मिळेल,” असे हार्दिकने आश्वासन दिले. 

आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि या मोसमात अष्टपैलू म्हणून खेळणार असल्याचे  हार्दिकने शेवटी सांगितले, “मला माझ्या शरीरात कोणतीही समस्या नाही. शक्य ते सर्व सामने खेळण्याची माझी योजना आहे,” असे तो म्हणाला. मुंबई इंडियन्स रविवारी २४ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांच्या आयपीएल २०२४ मोहिमेला सुरुवात केली

मुंबई इंडियन्स - हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, आकाश मढवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीलशान मदुशंका, गेराल्ड कोएत्झी, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुशारा, पीयूष चावला, रोमारिओ शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद 

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्या