Join us

विराट कोहलीच्या कामगिरीचा मला अभिमान; निकालांच्या आधारे त्रुटी शोधणे सोपे - रवी शास्त्री

शास्त्री - कोहली जोडीने टीम इंडियासाठी अप्रतिम कामगिरी केली. मात्र, विराटकडून बीसीसीआयने वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेतले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 06:29 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदावर  मत मांडले आहे. ‘निकालांच्या आधारे त्रुटी शोधणे फार सोपे आहे, तथापि विराटसारख्या स्टार खेळाडूने आपल्या कार्यकाळात जे काही साध्य केले, त्याचा मला अभिमान वाटतो,’ या शब्दात शास्त्री यांनी कोहलीचे समर्थन केले.

शास्त्री - कोहली जोडीने टीम इंडियासाठी अप्रतिम कामगिरी केली. मात्र, विराटकडून बीसीसीआयने वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेतले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला   वनडे कर्णधार बनविण्यात आले आहे. कोहलीकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्याच्या निर्णयावर शास्त्री म्हणाले, ‘शेवटी विराट हा एक कुशल कर्णधार आहे. तुम्ही किती धावा केल्या, यावरून लोक तुमचा निकाल नेहमी ठरवतील. विराटने स्वत:ला विकसित केले.  खेळाडू म्हणून तो परिपक्व आहेच. भारतीय संघाचा कर्णधार होणे सोपे नाही. त्याने जे काही मिळवले, त्याचा त्याला अभिमान वाटायला हवा. मला आठवते, की  सुनील गावसकर यांनी स्वत:च्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कर्णधारपद सोडले होते.  सचिन तेंडुलकरनेही हेच केले. विराट कोहली कसोटी क्रिकेटच्या बाबतीत किती समर्पित आहे, हे आपण सर्व जाणतो. संघाला यश मिळवून देण्यासाठी तो सर्वस्व झोकून देतो.’

रोहित शर्माला वनडेचे कर्णधार बनविल्याबद्दल शास्त्री म्हणाले, ‘रोहित नेहमीच संघासाठी जे सर्वोत्तम आहे, ते करतो. संघातील प्रत्येक खेळाडूचा तो पुरेपूर लाभ घेतो. रोहित आणि विराट कोहली हे एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही प्रकारात महान खेळाडू आहेत. या संघाकडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी पराभूत करीत हे सिद्ध केले होते.’

विराट कोहली आणि रवी शास्त्री यांचे संबंध फार चांगले होते. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर कोहलींमुळेच रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आणि दोन्ही खेळाडू एकमेकांचे खूप कौतुक करतात. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ पूर्ण होताच बीसीसीआयने विराट कोहलीचे पंख छाटणे सुरू केले.  कोहली आता केवळ कसोटी संघाचा कर्णधार म्हणून मर्यादित भूमिकेत असेल.

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्री
Open in App