साऊथम्पटन : विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी अंतिम एकादशमध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडऐवजी निवड झाल्याबद्दल मी स्वत: संभ्रमात असल्याचे स्टार इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर याने म्हटले आहे.
४८५ गडी बाद करणाऱ्या ब्रॉडला वगळून आर्चरला संघात स्थान देण्यात आले. या सामन्यात मी स्वत:ची ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन, असे आर्चरने सांगितले. गोलंदाजी माºयासाठी जिम्मी अॅन्डरसन, मार्क वूड, आर्चर यांच्यासह कर्णधार बेन स्टोक्स स्वत: वेगवान गोलंदाज असून डॉम बेस हा एकमेव फिरकीपटू आहे.
मागच्या अॅशेस मालिकेत कसोटी पदार्पण करणारा आर्चर पुढे म्हणाला,‘ब्रॉडऐवजी मला संधी का देण्यात आली हे माहीत नाही. याबाबत विचार आला की संभ्रम निर्माण होतो. आता संधी मिळालीच तर मला देखील देदीप्यमान कामगिरी करावीच लागेल. माझी निवड का झाली हे सिद्ध करून दाखवावे लागेल.’
बुधवारी सुरू झालेल्या सामन्याच्यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंनी मैदानावर गुडघ्यावर वाकून ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ला पाठिंबा दिला. उभय संघातील खेळाडूंच्या टी शर्टवर ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’चा लोगो देखील आहे.
आर्चर हा सध्याच्या इंग्लंड संघात एकमेव कृष्णवर्णीय खेळाडू आहे. त्याने सहकाऱ्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.‘ हे उदाहरण केवळ कृष्णवर्णीय खेळाडूंसाठी नव्हे तर संपूर्ण मानव समुदायासाठी डोळ्यांत अंजन घालणारे ठरावे,’असे स्काय स्पोटर््सशी बोलताना आर्चर म्हणाला.(वृत्तसंस्था)