BCCI Jobs:बीसीसीआय, म्हणजेच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (Board of Control for Cricket in India) हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. भारतातील सर्व क्रिकेटविषयक कामकाजाचे नियंत्रण बीसीसीआयकडेच असते. आंतरराष्ट्रीय सामने असो, देशांतर्गत स्पर्धा असो, आयपीएल असो किंवा खेळाडूंचे प्रशिक्षण असो, सर्व कामे बीसीसीआयमार्फत केले जाते.
या बीसीसीआयबद्दल अनेकांच्या मनात प्रचंड आकर्षण आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांना बीसीसीआयमध्ये काम करण्याची इच्छा आहे. याचे कारण म्हणजे, या कामात प्रतिष्ठा आहे, उत्तम पगार मिळतो आणि क्रिकेटविश्वाशी थेट नाळही जुळते. पण, बीसीसीआयमध्ये नोकरी कशी मिळवता येते, यासाठी काय पात्रता लागते आणि येथे पगार किती मिळतो? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. चला जाणून घेऊ...
बीसीसीआयमध्ये नोकरी कशी मिळते?
बीसीसीआय वेळोवेळी विविध पदांसाठी भरती करतो. ही पदे विविध विभागांत असतात, जसे की मॅनेजमेंट, कोचिंग स्टाफ, टेक्निकल टीम, मेडिकल टीम, अॅडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग आणि मीडिया. बीसीसीआयमध्ये फक्त खेळाडू किंवा प्रशिक्षकच नव्हे, तर इतरही अनेक पदांसाठी संधी उपलब्ध असतात. अलीकडेच बीसीसीआयने जनरल मॅनेजर (मार्केटिंग) या पदासाठी भरतीची जाहिरात काढली होती.
या नोकऱ्यांची माहिती बीसीसीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.bcci.tv/ वर दिली जाते. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अटी वेगवेगळ्या असतात. नोकरी मिळवण्यासाठी सर्वप्रथम बीसीसीआयच्या https://www.bcci.tv/jobs या वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन वाचावे. त्यानंतर आपले रिझ्युमे ई-मेल करावे. काही पदांसाठी मुलाखत व परीक्षा देखील घेतली जाते.
बीसीसीआयमध्ये पगार किती मिळतो?
बीसीसीआयमध्ये पगार हा कर्मचाऱ्याच्या पदानुसार आणि अनुभवावर अवलंबून असतो. सुरुवातीला किमान पगार 20,000 ते 30,000 रुपये प्रतिमहिना इतका असू शकतो. मात्र पद, अनुभव आणि कौशल्य वाढत गेले की, पगार थेट लाखोंमध्ये पोहोचतो. याशिवाय, बीसीसीआय आपल्या केंद्रीय करारबद्ध खेळाडूंना (Centrally Contracted Players) स्वतंत्र वार्षिक वेतन देते. उदाहरणार्थ, ग्रेड C मधील खेळाडूंना वर्षाला 1 कोटी रुपयांचे मानधन दिले जाते.