Join us

अनकॅप्ड प्लेयरच्या गटातून खेळणं धोनीसाठी ठरेल घाट्याचा सौदा; पण 

क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी कॅप्टन अनकॅप्ड गटात  कसा मोडू शकतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 12:33 IST

Open in App

आयपीएल हंगामाआधी आणि हंगामाची सांगता झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून धोनी हा केंद्रबिंदू असल्याचे दिसते. तो पुन्हा मैदानात उतरावा ही गोष्ट त्याच्या प्रत्येक चाहत्याच्या मनात असते. आगामी हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावाआधी पुन्हा धोनीची चर्चा आहे. यावेळी कारण थोडं वेगळं आहे.

धोनी अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात खेळणार? 

महेंद्रसिंह धोनी हा आगामी आयपीएलमध्ये अनकॅप्ड प्लेयरच्या गटातून खेळेल, असे बोलले जात आहे. यासाठी चेन्नई सुपर किंग्सनं फिल्डिंगही लावल्याची चर्चा आहे. आता क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी कॅप्टन अनकॅप्ड गटात  कसा मोडू शकतो? हा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.  यामागचं कारण ज्यानं राष्ट्रीय संघात पदार्पणच केलेल नाही, तो खेळाडू अनकॅप्ड श्रेणीत मोडतो.  

काय आहे IPL मधील अनकॅप्ड खेळाडूसंदर्भातील नियम?

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) हंगामाआधी खेळाडूंसदर्भातील नियमांची घोषणा करेल. त्यावेळी धोनीला अनकॅप्ड खेळाडूच्या श्रेणीत ठेवले जाईल. आयपीएलच्या सुरुवातीपासून हा नियम लागू आहे. या नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कमीत कमी पाच वर्षांनी खेळाडूला अनकॅप्ड खेळाडूंच्या श्रेणीत टाकले जाते.  

हा सौदा CSK साठी फायद्याचा, पण धोनीचा घाटा पक्का 

मग धोनीसाठी ही श्रेणी कशी? जर आगामी मेगा लिलावाआधी त्याचा सौदा या श्रेणीतून झाला तर तो चेन्नईसाठी फायदेशीर असेल. पण धोनीला मात्र त्याचा घाटाच होईल. कारण धोनीच गत हंगामातील पॅकेज हे १२ कोटी रुपयांचे होते. जर तो अनकॅप्डमध्ये गेला तर ४ कोटी रुपयांमध्येही त्याला रिटेन करण्याची संधी CSK ला मिळेल.

या नियमासंदर्भात काय म्हणाले आहेत CSK संघाचे सीईओ?

धोनी अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात खेळणार का? या प्रश्नावर चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनाही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, "यासंदर्भात मला अधिक माहिती नाही. आम्ही या नियमाची मागणी केलेली नाही. बीसीसीआयनेच आम्हाला हा नियम लागू होऊ शकतो, यासंदर्भातील माहिती दिली होती." असे ते म्हणाले आहेत.

आदर्श सेट करण्याची चांगली संधी

महेंद्रसिंह धोनी हा ४३ वर्षांचा आहे. हा सौदा त्याच्यासाठी घाट्याचा असला तरी या वयात मोठ्या रक्कमेसह रिटेन होण्यापेक्षा नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी, यासाठी हा डाव एक आदर्श ठरेल. त्यामुळे घाट्याचा सौदार एका वेगळ्या नजरेमुळे त्याच्यासाठी फायद्याचाही ठरू शकेल. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२४