Join us  

क्रिकेटमध्ये धो धो पैसा आला कसा? कधी?.. आणि कुठून? 

१९६४-६५ची गोष्ट. मी अर्ध्या निळ्या चड्डीत शाळेत होतो. क्रिकेटमधले माझे त्यावेळचे देव होते रमाकांत देसाई, बापू नाडकर्णी, नरेन ताम्हाणे, अजित वाडेकर वगैरे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 8:08 AM

Open in App

द्वारकानाथ संझगिरी, चित्रपट-क्रीडा समालोचक

काळाच्या विहिरीत खोलवर जाताना कधीकधी खूप गंमत वाटते. रिकाम्या शारजहा स्टेडियमवर आयपीएलच्या मॅचेस बघताना चित्रपटातल्या फ्लॅशबॅकसारखा जुना काळ माझ्या डोळ्यासमोरून सरकतो. १९६४-६५ची गोष्ट. मी अर्ध्या निळ्या चड्डीत शाळेत होतो. क्रिकेटमधले माझे त्यावेळचे देव होते रमाकांत देसाई, बापू नाडकर्णी, नरेन ताम्हाणे, अजित वाडेकर वगैरे. ते सर्व चक्क माझ्या वडिलांप्रमाणे मुंबईच्या लोकल ट्रेनने ऑफीसला जात. आज रोहित शर्मा बोरिवली स्टेशनवर लोकल ट्रेनमध्ये चढतोय, असा विचार करू शकता का?

१९६६ साली पहिली कसोटी खेळणारा अजित वाडेकर फाटक्या बुटाने ब्रेबोर्नवर सराव करत होता. सोबर्सने ते पाहिलं. त्याने अजितच्या शिवाजी पार्कच्या घराचा पत्ता घेतला. टॅक्सी केली आणि नवीन बूट त्याने अजितच्या घरी नेऊन दिले. हे असे आमचे देव! सुनील गावस्कर मोठा झाला आणि त्याने क्रिकेटमध्ये पैसे आणले. क्रिकेटपटू श्रीमंत झाले, असं पहिल्यांदा जाणवलं. सुनीलला मिळणाऱ्या पैशाचं कौतुक आणि थोडी असूया त्यावेळी जुन्या क्रिकेटपटूंत होती.

नंतर पॅकर्स सर्कस आली. क्रिकेटमध्ये पैशाची गंगाच अवतरली! दुर्दैवाने राष्ट्रप्रेमाचा इश्यू करून भारतीय खेळाडूंना त्यात भाग घ्यायला दिला गेला नाही. मग शारजहाचा शेख बुखातीर आणि असिफ इकबाल यांनी शारजहात क्रिकेट सुरू केलं. भारतीय क्रिकेटपटूंना जणू सोन्याची लंका सापडली. मी १९८४ ते २००० पर्यंत अनेकदा स्पर्धा कव्हर करायला गेलो. ते बुखातीरचं शारजहा कॉन्टिनेटल हॉटेल. तो थाटबाट. ते खेळाडूंबरोबर राहणं. सर्वच स्वप्नवत होतं. शारजहातल्या परदेशी ब्रँडनी आमचे डोळे दिपायचे. क्रिकेटपटूंचेसुद्धा दिपायचे. तिथलं चलन दिरहम हे तेव्हा बरंच स्वस्त चलन होतं. ३.५० रुपये म्हणजे एक दिरहम. १० दिरहममध्ये शर्ट, २० दिरहममध्ये चांगली पॅन्ट यायची.

एक क्रिकेटपटू मला म्हणाला होता, ‘आम्ही रूमवर आलो की अलाउन्सचं पाकीट टेबलावर असे. त्यातले पैसे मोजायचो आणि थेट शॉपिंगला जायचो!’ शारजहाच्या सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये सोन्याच्या नाण्याने टॉस उडवत. जो जिंकला त्याला ते नाणं मिळे. जावेद मियाँदादचा तो शेवटच्या बॉलवरचा सिक्स आठवतो? त्यानंतर पाकिस्तानात जाताना तो बक्षीस मिळालेली एक कार आणि सहा पेटारे भरून वस्तू घेऊन गेला. १९८७चा विश्वचषक कव्हर करण्यासाठी मी पाकिस्तानात गेलो, त्यावेळी तिथे जावेद मियाँदादच्या अनेक कथा कळल्या. त्याने पाकिस्तानात पोहोचल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट काय केली असेल? तर त्याला मिळालेल्या गाडीची ड्यूटी जिया उल हक या त्यांच्या पंतप्रधानांकडून माफ करून घेतली. आणि लगेचच भरपूर पैसे घेऊन ती गाडी विकून टाकली. पुढे क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचा भूकंप झाला, त्याचा केंद्रबिंदू हा शारजहाच असल्याचं पुढे आलं आणि हे सगळं थांबलं.

-काही वर्षं अशीच गेली. आणि आता नवीन अलिबाबा कोण? - असा प्रश्न पडलेला असतानाच एक मसीहा आला- ललित मोदी. त्याने आयपीएल सुरू केली. त्याच्या त्या भन्नाट मॉडेलमुळे सगळेच मालामाल झाले. संघातील छोट्यातला छोटा खेळाडू हा ५० लाख रुपये आरामात घेऊन जातो. या खेळाडूंची किंमत कशी ठरवतात? हे गणित खरं तर मला अजूनही कळलेलं नाही. यात काही सामान्य दर्जाचे खेळाडूसुद्धा प्रचंड श्रीमंत होऊन गेले. उनाडकट या गोलंदाजाचं घ्या. २०१७ साली पुण्याने या उनाडकटला ३० लाख रुपयाला घेतला. (गुगलच्या माहितीप्रमाणे.) २०१८ साली त्याच उनाडकटला राजस्थानने ११.५० कोटी दिले. म्हणजे कुठल्याही माणसाला इतका मोठा राइज एका वर्षात? त्याच्या पुढच्या वर्षी ते ८.५० कोटीवर आले. कारण अपेक्षित परफॉर्मन्स झाला नव्हता. तरीसुद्धा घसरलेल्या परफॉर्मन्सला ३ कोटी रुपये मिळतात हे लक्षात घ्या. मला सांगा, अशा परिस्थितीमध्ये कुणाला त्या दुबई, शारजहामधल्या दुकानात जायचंय? पार्ट्यांना जायचंय? ...मस्तपैकी सर्वजण बायो बबलमध्ये म्हणजे एका सोनेरी पिंजऱ्यात बसलेले आहेत. त्यांना सोन्याचे दाणे मिळताहेत. फक्त भारताचेच नव्हे, जगभरातले खेळाडू सरसकट मालामाल झाले! ही सगळी मंडळी फारशा टेस्ट मॅचेच खेळण्याचे कष्ट न घेता श्रीमंत झाली. आता हे मॉडेल किती दिवस चालेल? आणि समजा, बंद पडलं तर. आणखी नवा मसीहा येईलच की! 

टॅग्स :पैसा