- सौरव गांगुली लिहितात...
दक्षिण आफ्रिकेने गेल्या सामन्यात विजय मिळवत ‘पिंक डे’ सामन्यातील विजयी मालिका कायम राखली. शनिवारी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना कमी षटकांचा झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा विजय सोपा झाला, असा प्रश्न उपस्थित होतो. कदाचित, यात तथ्य असू शकते.
षटकांच्या संख्येपेक्षा पावसाच्या व्यत्ययाची भारतीय संघाला अधिक झळ बसली. त्यामुळे भारतीय फिरकीपटूंना गोलंदाजी करताना अडचण भासली. यापूर्वीच्या तिन्ही सामन्यांत फिरकीपटूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. कदाचित दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी करताना भारतीय फिरकीपटूंना २१ विकेट बहाल केल्या असाव्या. शनिवारी जमिनीतील ओलाव्यामुळे चेंडू बॅटवर वेगाने येत होता. त्याची दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मदत झाली.
एबी डिव्हिलियर्स परतणे दक्षिण आफ्रिका संघासाठी सकारात्मक बाब ठरली. त्याने मोठी खेळी केली नसली तरी त्याच्या समावेशामुळे दक्षिण आफ्रिका संघाची मधली फळी अधिक मजबूत झाली. दक्षिण आफ्रिकेने फिरकीपटूला वगळत सर्व वेगवान गोलंदाजांना खेळविण्याचा घेतलेला निर्णयही योग्य ठरला.
भारतीय संघाला या पराभवाची चिंता करण्याची गरज नाही. भारतीय संघ चांगला खेळत असून पोर्ट एलिझाबेथमध्ये संघाला मालिका विजय साजरा करण्याची संधी आहे.
शिखर धवन व विराट कोहली चांगले खेळत असून प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवित आहेत. ही जोडी खेळपट्टीवर असताना धावगती शानदार असते, ही चांगली बाब आहे. या दोघांपैकी एक बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज डाव पुढे साकारतो. वाँडरर्समध्ये अखेरच्या १५ षटकांमध्ये मात्र याची उणीव भासली. शनिवारची लढत भारतीय फिरकीपटूंसाठी ‘आॅफ डे’ ठरली असली तरी मिलर, क्लासन, फेलुकवायो आणि मार्कराम यांची फटक्यांची निवड भारतीय फिरकीपटूंचा उत्साह वाढविणारी बाब आहे. पोर्ट एलिझाबेथचे मैदान मोठ्या धावसंख्येसाठी ओळखल्या जात नाही आणि दक्षिण आफ्रिकेसाठी हा महत्त्वाचा समाना आहे. (गेमप्लॅन)