लंडन : टीम साऊदीच्या (६-४३) भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडनेइंग्लंडचा पहिला डाव शनिवारी चौथ्या दिवशी चहापानाला २७५ धावात गुंडाळला आणि पहिल्या डावात आघाडी घेतली. अखेरच्या दिवशीचा खेळ शिल्लक असलेल्या या कसोटीची वाटचाल अनिर्णीत अवस्थेकडे सुरू आहे.
सलामीवीर रोरी बर्न्सची (१३२ धावा, २९७ चेंडू, १६ चौकार, १ षटकार) शतकी खेळी इंग्लंडच्या डावाचे ठळक वैशिष्ट्य ठरली. ज्यो रुट व ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी ४२ धावांची खेळी केली. न्यूझीलंडतर्फे साऊदी व्यतिरिक्त जेमिसनने ८५ धावात ३ तर वँगनरने ८३ धावात १ बळी घेतला.
पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी घेणाऱ्या न्यूझीलंडने दुसऱ्या डावात दिवसअखेर २ बाद ६२ धावांची मजल मारली होती. न्यूझीलंडकडे एकूण १६५ धावांची आघाडी असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत. आजचा खेळ थांबला त्यावेळी टॉम लॅथम(३०) याला नील वँगनर (२) साथ देत होता.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव ३७८. इंग्लंड पहिला डाव १०१.१ षटकात सर्वबाद २७५ (बर्न्स १३२, रुट ४२, ओली रॉबिन्सन ४२; साऊदी ६-४३, जेमिसन ३-८५, वँगनर १-८३). न्यूझीलंड दुसरा डाव ३० षटकांत २ बाद ६२ (लॅथम नाबाद ३०, कॉनवे २३, वँगनर नाबाद २; रॉबिन्सन २-८)