बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली. ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्व ५० षटके केवळ फिरकी गोलंदाजांकडून टाकण्याचा विक्रम केला.
शेर-ए-बांगला स्टेडियमची खेळपट्टी संथ आणि फिरकीला मदत करणारी होती. खेळपट्टीची स्थिती लक्षात घेऊन वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने एकही वेगवान गोलंदाज न वापरता, केवळ पाच फिरकी गोलंदाजांकडून पूर्ण ५० षटके टाकण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात गुडाकेश मोतीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. अखिल होसेन आणि ॲलिक अथानाझे या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. रोस्टन चेस आणि खारी पियरे यांनीही अचूक गोलंदाजी केली. गुडाकेश मोती वगळता सर्व गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट ६ पेक्षा कमी होता, ज्यामुळे बांगलादेशचे फलंदाजांना धावा करताना संघर्ष करावा लागला. बांगलादेशने ५० षटकांत ७ विकेट्स गमावून २१३ धावा केल्या. सलामीवीर सौम्या सरकार याने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तर, अखेरीस रिशाद हुसेनने नाबाद ३९ धावा करत संघाला २०० चा टप्पा ओलांडून दिला.
याच मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही फिरकी गोलंदाजांचा दबदबा दिसून आला होता. बांगलादेशने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव फक्त १३३ धावांवर संपुष्टात आला. त्या सामन्यात रिशाद हुसेनने सहा विकेट्स घेऊन वेस्ट इंडिजला दारूण पराभव पत्करायला लावला .आता दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचे फलंदाज फिरकी-अनुकूल खेळपट्टीवर २१४ धावांचे लक्ष्य गाठू शकतात का? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.