Join us  

जे भारताला जमलं नाही ते अफगाणिस्ताननं करून दाखवलं, दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

अफगाणिस्तान संघाने सोमवारी कसोटी सामन्यात आयर्लंडवर 7 विकेट राखून विजय मिळवत इतिहास घडवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 1:03 PM

Open in App

देहराडून : अफगाणिस्तान संघाने सोमवारी कसोटी सामन्यात आयर्लंडवर 7 विकेट राखून विजय मिळवून इतिहास घडवला. अफगाणिस्तानचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला आणि यासह त्यांनी विक्रमाची नोंद करताना भारताला न जमलेली गोष्ट करून दाखवली. आर्यलंड संघाने विजयासाठी ठेवलेले 147 धावांचे लक्ष्य अफगाणिस्तानने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. अफगाणिस्तानचा रशीद खान आणि रहमत शाह यांनीही या सामन्यात विक्रमी कामगिरी केली. अफगाणिस्तानने या विजयासह इंग्लंड आणि पाकिस्तान या दादा संघांच्या पंक्तीत स्थान पटकावले.  आयर्लंडचा पहिला डाव 172 धावांत गुंडाळल्यानंतर अफगाणिस्तानने 314 धावा चोपल्या. रहमत शाहचे ( 98) शतक अवघ्या दोन धावांनी हुकले, परंतु कसोटीत अर्धशतकी खेळी करणारा तो अफगाणिस्तानचा पहिलाच खेळाडू ठरला. त्याला हशमतुल्लाह शाहिदी ( 61) आणि कर्णधार असघर अफघान ( 67) यांची उत्तम साथ लागली. पण, आयर्लंडने दुसऱ्या डावात सुरेख खेळ केला. त्यांच्या अँडी बॅलबर्नी ( 82) आणि केव्हीन ओ'ब्रायन ( 56) यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला दुसऱ्या डावात 288 धावांचा पल्ला गाठून दिला. त्यांच्या या खेळीमुळे अफगाणिस्तानसमोर 147 धावांचे आव्हान ठेवले. या डावात अफगाणिस्तानच्या रशीद खानने पाच विकेट घेतल्या आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाच विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये स्थान पटकावले.19 मार्च 1877 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्याच कसोटीत इंग्लंडला नमवले होते आणि आज 18 मार्च 2019 ला अफगाणिस्तानने पहिला कसोटी विजय मिळवला. पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्याच नावावर आहे, परंतु अफगाणिस्तानने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून इतिहास घडवला. इंग्लंड आणि पाकिस्तान या संघांनी आपल्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या विजयाची चव चाखली होती. त्यांच्या पंक्तीत अफगाणिस्तानने स्थान पटकावले. 147 धावांचा पाठलाग करताना एहसानुल्लाह ( 65*) आणि रहमत शाह ( 76) यांनी अर्धशतकी खेळी केली. एकाच कसोटीत दोन्ही डावांत अर्धशतक करण्याचा विक्रमही रहमतने आपल्या नावावर केला. एकिकडे अफगाणिस्तानने दुसऱ्याच कसोटीत पहिल्या विजयाची चव चाखत दिग्गजांच्या पंक्तीत स्थान पटकावले आणि भारतीय संघालाही न जमलेली गोष्ट करून दाखवली. भारताला पहिला कसोटी विजय 25 सामन्यांनंतर मिळाला होता. 

 

टॅग्स :अफगाणिस्तानआयर्लंड