Ranji Trophy Top Scorer Yash Rathod Overtakes Vinod Kambli Record : विदर्भ क्रिकेट संघाचा २५ वर्षीय बॅटर यश राठोड देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करत आहे. २०२५-२६ च्या हंगामातील रणजी करंडक स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत विदर्भ विरुद्ध तमिळनाडू यांच्यातील सामना कोइंबतूर येथील श्री रामकृष्ण कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आला. अनिर्णित राहिलेल्या या सामन्यात यश राठोड याने १८९ चेंडूत १३३ धावांची खेळी केली. प्रथम श्रेणीतील ९ व्या शतकी खेळीसह यशनं खास विक्रमाला गवसणी घातली. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धेत सर्वाधिक सरासरीसह धावा करण्याच्या बाबतीत त्याने भारताचा माजी कर्णधार विनोद कांबळी आणि विजय हजारे या दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशचा मोठा पराक्रम; विनोद कांबळी आणि विजय हजारे या दिग्गजांना टाकले मागे
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये यश ठाकूरनं आतापर्यंत ६० च्या सरासरीसह २२८० धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणीत सर्वाधिक सरासरीसह २००० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत त्याने विजय हजारे (५८.३८) आणि विनोद कांबळी (५९.६७) यांना मागे टाकले आहे. एकंदरीत विचार करता प्रथम श्रेणीत सर्वोच्च सरासरीसह २००० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यश राठोड १२ व्या स्थानावर आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये यशची कामगिरी
सध्याच्या प्रथम श्रेणी हंगामात यश राठोडनं ८ डावात १०१ च्या सरासरीसह ६७ च्या सरासरीसह ६१० धावा केल्या आहेत. गत रणजी हंगामात त्याने १० सामन्यात ९६० धावा करत विदर्भ संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. याशिवाय त्याने दुलिप करंडक स्पर्धेत मध्य विभाग संघाकडून खेळताना ३ सामन्यात ३२४ धावा केल्या आहेत. ईराणी कप स्पर्धेत त्याने एकमेव सामना खेळला असून या सामन्यात त्याने ९१ आणि ५ धावांची खेळी केली होती. तमिळनाडू विरुद्धच्या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९ वे शतक झळकवण्याआधी यशनं यंदाच्या हंगामातील नागालँड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ७१ धावा तर झारखंड विरुद्ध नाबाद १०१ धावांची खेळी केली होती.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च सरासरीस धावा करणारे आघाडीचे १२ फलंदाजांचा रेकॉर्ड
| क्रमांक | खेळाडू | धावा | सरासरी | शतकं | अर्धशतकं | सर्वोच्च धावसंख्या |
|---|
| १ | डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया) | २८,०६७ | ९५.१४ | ११७ | ६९ | ४५२* |
| २ | विजय मर्चंट (भारत) | १३,४७० | ७१.६४ | ४५ | ५२ | ३५९* |
| ३ | जॉर्ज हेडली (वेस्ट इंडिज) | ९,९२१ | ६९.८६ | ३३ | ४४ | ३४४* |
| ४ | अजय शर्मा (भारत) | १०,१२० | ६७.४६ | ३८ | ३६ | २५९* |
| ५ | बिल पॉन्सफर्ड (ऑस्ट्रेलिया) | १३,८१९ | ६५.१८ | ४७ | ४३ | ४३७ |
| ६ | बिल वुडफुल (ऑस्ट्रेलिया) | १३,३८८ | ६४.९९ | ४९ | ५८ | २८४ |
| ७ | सरफराज खान (भारत) | ४,७६० | ६४.३२ | १६ | १५ | ३०१* |
| ८ | शांतनू सुगवेकर (भारत) | ६,५६३ | ६३.१० | १९ | २६ | २९९* |
| ९ | कमिंदू मेंडिस (श्रीलंका) | ५,०५२ | ६१.६० | १८ | २४ | २००* |
| १० | के. सी. इब्राहिम (भारत) | ४,७१६ | ६१.२४ | १४ | २२ | २५० |
| ११ | दरविश रसूली (अफगाणिस्तान) | २,६८१ | ६०.९३ | १० | ९ | २४९ |
| १२ | यश राठोड (भारत) | २,२८० | ६०.०० | ९ | १० | १९४ |