मुंबई : आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचे शनिवारी निधन झाले होते. बहिणीच्या निधनानंतरचे अंतिम सोपस्कार पार पाडून आयपीएलमध्ये परतलेल्या हर्षलने तिच्या आठवणी जागवल्या आहेत.
३१ वर्षीय जलदगती गोलंदाज हर्षलने सोशल मीडियावर बहिणीसोबतचा फोटोे टाकत त्याखाली लिहिले की, ‘दीदी, तू आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी आणि दयाळू व्यक्तींपैकी एक होती. तू तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवूनच आयुष्यातील कठीण परिस्थितींचा सामना केलास. मी जेव्हा भारतात परत येण्यापूर्वी तुझ्यासोबत रुग्णालयात होतो तेव्हा खेळावर लक्ष केंद्रित कर, तू माझी काळजी करू नकोस, असे तू मला सांगितले होते. त्यामुळेच मी पुन्हा मैदानावर उतरू शकलो.
यापुढे मी ते सर्व करेन, ज्यामुळे तुला माझा अभिमान वाटत होता. मी माझ्या आयुष्यातील सुख आणि दु:खात तुला स्मरण करेन. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, आराम कर दीदी.’ अशा शब्दात हर्षलने बहिणीच्या आठवणी जागवल्या आहेत. त्याच्या या इन्स्टा पोस्टवर अनेकांनी कमेंट करून भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच श्रद्धांजलीही वाहिली आहे.