Join us

Helicopter Landing on Ground: पाहावं ते नवलंच! अचानक हेलिकॉप्टर मैदानातच उतरलं, क्रिकेटर्सची झाली पळापळ; कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने खेळाडू घाबरले

आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्टेडियममधील मोकळी जागा सोडून खेळाडूं जिथे होत, तिथे हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 09:34 IST

Open in App

क्रिकेटच्या मैदानात अचानक हेलिकॉप्टरचं लँडिंग झाल्याने क्रिकेटर्सची पळापळ झाल्याची घटना बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (Bangladesh Premier League) स्पर्धेदरम्यान घडली. हेलिकॉप्टर अचानक जमिनीवर उतरल्याने काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. चट्टोग्राममधील एमए अझीझ स्टेडियममध्ये मिनिस्टर ग्रुप ढाका संघाचे खेळाडू सराव करत असताना ही घटना घडली. क्रिकेटच्या मैदानावर हेलिकॉप्टर उतरण्याची ही पहिलीच घटना आहे असं मूळीच नाही. पण, यावेळी हेलिकॉप्टर कोणतीही पूर्वसूचना न देता उतरल्याने खेळाडू थोडेसे घाबरल्याचं दिसून आलं. अचानक असं घडत असल्यामुळे खेळाडूंची पळापळ झाली आणि उडणाऱ्या धुळीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी खेळाडू लपायला धावल्याचेही दिसून आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी हेलिकॉप्टर स्टेडियममध्ये उतरलं. यावेळी मिनिस्टर ग्रुप ढाका संघातील सर्व खेळाडू तेथे सराव करत होते. आंद्रे रसल, तमीम इक्बाल, मशरफी मुर्तझा, मोहम्मद शहजाद यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूही मैदानात हजर होते. हेलिकॉप्टर अचानक जमिनीवर उतरल्याने हे सर्व खेळाडू हैराण झाले आणि सुरक्षा आणि धुळीच्या कणांपासून स्वतःला वाचवण्यासाठी खेळाडू इकडून तिकडे धावताना दिसले.

लँड केलेलं हेलिकॉप्टर हे एअर अॅम्ब्युलन्स म्हणून वापरलं जात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या इमर्जन्सी लँडिंगबाबत त्यांनी जिल्ह्याचे आयुक्त आणि जिल्ह्यातील क्रीडा संघटनांना कळवलं होतं. मात्र, असं असलं तरी BPL च्या आयोजकांना आणि खेळाडूंना याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यातही नवल म्हणजे, स्टेडियममधील रिकाम्या जागेवर हेलिकॉप्टर उतरण्या ऐवजी खेळाडू जिथे सराव करत होते तिथे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. स्टेडियममधून लवकरात लवकर रूग्णाला बाहेर नेण्याचा तोच सर्वोत्तम मार्ग असल्याने तेथे हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं असावं असा अंदाज बांधला जात आहे.

टॅग्स :बांगलादेश
Open in App