इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या भात्यातून आणखी एक कडक खेळी पाहायला मिळाली. पहिल्या कसोटी सामन्यातील शतकवीरानं दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात लंच आधी अर्धशतक साजरे केले. पहिल्या डावातील २२ व्या षटकात जोस टंगच्या गोलंदाजीवर बॅक टू बॅक चौकार मारत यशस्वीनं ५९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यशस्वी इंग्लंडच्या गोलंदाजांना तर नडलाच, पण तो इंग्लंडच्या कॅप्टनलाही भिडल्याचे दिसून आले. मैदानातील दोघांच्यातील शाब्दिक वादही चर्चेचा विषय ठरतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
..अन् यशस्वी जैस्वालबेन स्टोक्सला भिडला
भारतीय संघाच्या पहिल्या डावातील १७ व्या षटकात टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला भिडल्याचे दिसून आले. मैदानात हे दोन्ही खेळाडू एकमेकांना काहीतरी म्हणताना दिसले. दोघांच्यातील हे दृश्य दाखवणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बेन स्टोक्सच्या या षटकात यशस्वी जैस्वालनं एक खणखणीत चौकारही मारला.
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
यशस्वी जैस्वाल- करुण नायर यांची अर्धशतकी भागीदारी
भारतीय संघाने अवघ्या १५ धावांवर पहिली विकेट गमावल्यावर यशस्वी जैस्वालनं पुन्हा एकदा आपल्या भात्यातील खास नजराणा पेश करत अर्धशतक ठोकले. लोकेश राहुल अवघ्या २ धावांवर बाद झाल्यावर त्याने करुण नायरसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी रचली. करुण नायरच्या रुपात टीम इंडियाने ९५ धावांवर दुसरी विकेट गमावली. लंच ब्रेकपर्यंत भारतीय संघाने २५ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात ९८ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल ६२ धावांवर नाबाद खेळत होता. सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या शतकाचा डाव साधण्याची संधी त्याच्याकडे आहे.