Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद शामीच्या संपत्तीवर हसीनचा डोळा; खुर्शिद यांनी केला खुलासा

हसीनचा शामीच्या संपत्तीवर डोळा आहे, असा खुलासा त्याचे काका खुर्शिद यांनी केले आहे. खुर्शिद यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आता कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 18:38 IST

Open in App
ठळक मुद्देमोहम्मदने मला तिच्याशी बोलून हे प्रकरण मिटवायला सांगितले होते - खुर्शिद

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले आहेत. पण तिने हे आरोप का केले, हे आता साऱ्यांपुढे आले आहे. हसीनचा शामीच्या संपत्तीवर डोळा आहे, असा खुलासा त्याचे काका खुर्शिद अहमद यांनी केला आहे. खुर्शिद यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आता कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

शामी आणि त्याच्या कुटुंबियांची गुन्हे अन्वेषण शाखेने आज त्याच्या गावी जाऊन कसून चौकशी केली. त्याचबरोबर शामीवर गंभीर आरोप लावणाऱ्या हसीन जहाँबाबतही त्यांनी बऱ्याच लोकांकडे चौकशी केली. हसीनचा स्वभाव कसा होता आणि ती लोकांबरोबर कशी वागत होती, याबाबतही गुन्हे शाखेने यावेळी चौकशी केली. सहसपूर, हे शामीचे गाव आहे. गुन्हे शाखेने शामीचे काका खुर्शिद यांना घेऊन सहसपूरला गेली. तिथे त्यांनी शामीचा भाऊ असर अहमदची चौकशी केली.

शामीच्या नातेवाईकांची गुन्हे अन्वेषण शाखेने चौकशी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी काही प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना खुर्शिद म्हणाले की, " मोहम्मदला हे प्रकरण न्यायालयात जाऊ नये असे वाटत होते. कारण या प्रकरणामुळे आमचे कुटुंब निराश झाले आहे. त्यामुळे मोहम्मदने मला तिच्याशी बोलून हे प्रकरण मिटवायला सांगितले होते." 

यावेळी खुर्शिद यांनी जो खुलासा केला आहे, त्याने साऱ्यांनाच धक्का बसेल. याप्रकरणी ते पुढे म्हणाले की, " मी हसीन आणि तिच्या वकिलांशी संवाद साधायला गेलो होतो. हे प्रकरण मिटवण्यासाठी हसीन तयारही झाली होती, या मोबदल्यात तिने मोहम्मदची काही संपत्ती मागितली होती. ही संपत्ती मिळवून आपल्याला मोठे घर घ्यायचे आहे, असे ती म्हणाली. हसीन हे सारे आरोप मोहम्मदची संपत्ती मिळावी यासाठीच करत आहे."

टॅग्स :मोहम्मद शामी