Join us

किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

KKR ने DCवर विजय मिळवून १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 18:01 IST

Open in App

कोलकाता नाईट रायडर्सने  काल इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. KKR ने हा विजय मिळवून १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली.  दिल्लीचे १५४ धावांचे लक्ष्य कोलकाताने १६.३ षटकांत ३ बाद १५७ धावा करून पार केले. या सामन्यात गोलंदाजांनी प्रमुख भूमिका बजावली आणि त्यापैकी एका गोलंदाजावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. त्याला १०० टक्के मॅच फी रक्कमही दंड म्हणून द्यावी लागणार आहे.

नाणेफेक जिंकून DC ने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि KKR च्या गोलंदाजांनी सुरेख मारा केला. रिषभ पंत ( २७) आणि कुलदीप यादव ( नाबाद ३५) यांनी चांगली फलंदाजी केली. दिल्लीला ९ बाद १५३ धावा करता आल्या.  वरुण चक्रवर्थीने ३, हर्षित राणा व वैभव अरोरा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क व सुनील नरीन यांनी प्रत्येकी १ विकेट घेत हातभार लावला. प्रत्युत्तरात, फिल सॉल्ट ( ६८), श्रेयस अय्यर ( ३३) व वेंकटेश अय्यर ( २६) यांनी चांगली फलंदाजी केली. या सामन्यात KKR चा गोलंदाज हर्षित राणा याच्याकडून आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन झाले आणि त्याला त्याची सर्व मॅच फी दंड म्हणून द्यावी लागेल. शिवाय त्याच्याकडून दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली गेली आहे.

Harshit Rana ने ८ सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याची इकॉनॉमी ही ९.७८ अशी आहे.  राणाने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा केला आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मॅच रेफ्रीची मंजुरी स्वीकारली. आचारसंहितेच्या लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी, सामनाधिकारीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. या खेळाडूला यापूर्वी आयपीएल आचारसंहितेच्या कलमानुसार दंड ठोठावण्यात आला होता.

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्स