Haris Rauf Takes Flying Catch NZ vs PAK 3rd T20I : पाकिस्तानच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज हॅरिस रौफ याने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अफलातून फिल्डिंगसह सर्वांना थक्क करून सोडले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडच्या ताफ्यातील ग्लेन फिलिप्सनं हवेत उडी मारून सुपरमॅनच्या तोऱ्यात कॅच घेतल्याची चर्चा चांगलीच गाजली. त्याला तोडीस तोड देणारा कॅच पाकिस्तान ताफ्यातील एखादा खेळाडू घेईल, याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसेल. कारण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत नेहमीच पाकिस्तानचा संघ कमकुवत दिसला आहे. पण हॅरिस रौफनं ते करून दाखवलंय. हवेत उडी मारत एका हातात झेल घेत या पाक गड्यानं हवा केलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हवेत उडी मारत एका हातात पकडला कॅच
पाक विरुद्धच्या सामन्यात यजमान न्यूझीलंड संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदी हा पहिले षटक घेऊन आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर फिन एलेन याने चेंडू फाइन लेगच्या दिशेनं फ्लिक केला. स्क्वेअर लेगवर फिल्डिंगला तैनात असलेल्या हॅरीस रौफनं हवेत उडी मारून एका हातात झेल पकडत न्यूझीलंड सलामीवीराचा खेळ खल्लास केला.
ग्लेन फिलिप्सप्रमाणेच हा कॅचही सर्वोत्तम
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ग्लेन फिलिप्स याने कमालीचे कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले होते. मोहम्मद रिझवान आणि विराट कोहली यांच्यासह शुबमन गिलचा त्याने हवेत उडी मारून घेतलेल्या झेलनंतर त्याला मॉडर्न क्रिकेटमधील सर्वोत्तम फिल्डर असा टॅग लागला. अगदी त्याच्या तोडीस तोड कॅच हॅरीस रौफनं घेतल्याचे पाहायला मिळाले. या एका कॅचवर तो सर्वोत्तम फिल्डर ठरणार नाही, ही गोष्ट खरीये. पण हा कॅच सर्वोत्तम कॅच पैकी एक आहे हे मात्र नक्की.
५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना न्यूझीलंडच्या संघानं १९.५ षटकात सर्वबाद २०४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग पाकिस्तानच्या संघानं अगदी सहज केला. हसन नवाजच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघानं ४ षटके आणि ९ गडी राखून सामना खिशात घातला. या विजयासह पाकिस्तान संघानं मालिकेतील आव्हान कायम ठेवले आहे. पहिल्या दोन सामन्यातील विजयासह न्यूझीलंडच्या संघाकडे अजूनही २-१ अशी आघाडी आहे.