गुजरात टायटन्सला ( Gujarat Titans) गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या अखेरच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ( RCB) पराभव पत्करावा लागला. हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) या सामन्यात दमदार खेळ करून RCB समोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली, परंतु विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांच्या फटकेबाजीने RCBला ८ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करण्याचा गुजरातचा निर्णय चुकला. शुबमन गिल व मॅथ्यू वेड झटपट माघारी परतले. हार्दिकच्या अतिघाईमुळे चांगला खेळणारा वृद्धीमान साहा रन आऊट झाला. त्यानंतर हार्दिकने एकाकी संघर्ष केला. या सामन्यात हार्दिकची फजिती झालेली पाहायला मिळाली . ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार मारल्यानंतर तो पुन्हा मोटा फटका मारण्यासाठी गेला. पण, यावेळेस त्याच्या हातून बॅट निसटली अन् ती अम्पायरच्या जवळ जाऊन पडली. हार्दिकची अशी फजिती झाल्यानंतर त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच हिला नेमकी काय रिअॅक्शन द्यावी हेच सूचले नाही. ती तोंडावर हात ठेवून हसताना दिसली.
वृद्धीमान साहा ( ३१), कर्णधार
हार्दिक पांड्या ( ६२*), डेव्हिड मिलर ( ३४) व राशिद खानच्या ६ चेंडूंत नाबाद १९ धावांच्या जोरावर गुजरातने ५ बाद १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ११५ धावांची भागीदारी केली. फॅफ ३८ चेंडूंत ५ चौकारांसह ४४ धावांवर बाद झाला. विराट ५४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७३ धावांवर स्टम्पिंग झाला. ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४० धावांची नाबाद खेळी करताना सामना १८.४ षटकांत संपवला. RCB ने ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला.