Join us

ताकदीनिशी गोलंदाजीसाठी सज्ज: हार्दिक पांड्या

फिटनेसमुळे नियमितपणे गोलंदाजी करू न शकल्याने हार्दिकने संघातील स्थान गमावले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 09:13 IST

Open in App

मॅन्चेस्टर:  ‘एक गोलंदाज म्हणून मला सूर गवसला आहे. भविष्यात गरजेनुसार संपूर्ण ताकदीनिशी संपूर्ण गतीने गोलंदाजीसाठी सज्ज असल्याचे,’ भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने सोमवारी सांगितले. फिटनेसमुळे नियमितपणे गोलंदाजी करू न शकल्याने हार्दिकने संघातील स्थान गमावले होते. आयपीएल २०२२ मध्ये मात्र त्याने धडाकेबाज पुनरागमन केले.  

इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत यशस्वी कामगिरी केली. फलंदाजीतील त्याच्या क्षमतेवर शंका घेण्याचे कारण नव्हते, पण इंग्लंडविरुद्ध गोलंदाजीतही त्याने अनेकांचे लक्ष वेधले.  हार्दिकने टी-२० आणि वन डे मालिकेत क्रमश: ३३ धावात चार आणि २४ धावात चार अशी विक्रमी कामगिरी केली. 

रविवारी कारकिर्दीत गोलंदाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्याने ऋषभ पंतसोबत शतकी भागीदारी करीत सामना जिंकवण्यात मोलाची भूमिका पार पाडली. सामन्यानंतर हार्दिक म्हणाला, ‘नियमित गोलंदाजी केल्याचे मला समाधान वाटते. प्रत्येक मालिकेनंतर चार किंवा पाच दिवस सराव केल्यामुळे ताजेतवाने राहण्यास आणि फिटनेस राखण्यास मदत होते. आयपीएलनंतर द. आफ्रिकेविरुद्ध मी आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले. हळूहळू गोलंदाजी सुरू केली. पहिल्या टी-२० सामन्यात चार बळी घेतल्यामुळे माझा आत्मविश्वास बळावला.  सातत्य राखण्यासाठी अशी कामगिरी फार आवश्यक आहे. खरे तर सामन्याआधी मी सराव करीत नाही, तरीही संपूर्ण प्रयत्नांसह काही तास गोलंदाजी करीत राहिलो. 

टॅग्स :हार्दिक पांड्या
Open in App