Join us  

पांड्या, राहुलवरील कारवाई निश्चित? दोन सामन्यांच्या बंदीची शक्यता

'कॉफी विथ करण'मधील 'त्या' विधानांची बीसीसीआयकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 12:29 PM

Open in App

नवी दिल्ली: कॉफी विथ करण कार्यक्रमात केलेली आक्षेपार्ह विधानं क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलला महागात पडण्याची शक्यता वाढली आहे. हार्दिक आणि राहुलनं कार्यक्रमात महिलांबद्दल केलेली विधानं वक्तव्य वादग्रस्त ठरली. या प्रकरणी बीसीसीआयचे प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दोन्ही खेळाडूंवर दोन सामन्यांची बंदी घालण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे या दोघांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. कॉफी विथ करण कार्यक्रमातील हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलच्या विधानांची बीसीसीआयकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीनं या संपूर्ण प्रकारापासून संघाला वेगळं ठेवलं आहे. पांड्या आणि राहुलची विधानं ही त्यांची मतं आहेत. संघाचा त्यांच्या विधानांशी कोणताही संबंध नाही, असं विराटनं स्पष्टपणे माध्यमांना सांगितलं आहे. दुसरीकडे बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरींनीही या विधानांवर आक्षेप घेतला आहे. दोन्ही क्रिकेटपटूंनी कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी घेतली होती का, अशी विचारणा चौधरींनी प्रशासकीय समितीकडे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल बीसीसीआयच्या कोषाध्यक्षांनी प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना इडुल्जींना पत्र लिहिलं आहे. 'कॉफी विथ करण कार्यक्रमात क्रिकेटपटूंनी (हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल) केलेल्या विधानांमुळे भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. त्यांचं वर्तन चुकीचं होतं,' असं चौधरींनी पत्रात नमूद केलं आहे. 'बीसीसीआयच्या नियमांनुसार क्रिकेटपटूंना कार्यक्रमात जाताना परवानगी घ्यावी लागते. तशी परवानगी या क्रिकेटपटूंनी घेतली होती का?', अशी विचारणादेखील चौधरींनी केली आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही खेळांडूवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :हार्दिक पांड्याकॉफी विथ करण 6भारतबीसीसीआयविराट कोहली