IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने ( GT) आयपीएल २०२२ फायनलमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवताना जेतेपद नावावर केले. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गुजरातने घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा ( RR) सहज पराभव केला. हार्दिकने गोलंदाजीत १७ धावांत विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीतही महत्त्वपूर्ण ३४ धावा केल्या. शुबमन गिलला दोन जीवदान देणे राजस्थानला महागात पडले. आर अश्विन ( R Ashwin) वर अतिभरवसा ठेवणेही RRला महागात पडले.
![]()
राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. गुजरात टायटन्सचा ( GT) कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) त्यांना तालावर नाचवले. हार्दिकने ४ षटकांत १७ धावा देताना ३ मोठ्या विकेट्स घेतल्या. यशस्वी जैस्वाल व जोस बटलर यांनी सावध सुरुवातीवर भर दिला. पण, यशस्वी ( २२), संजू सॅमसन ( १४), देवदत्त पडिक्कल ( २) हे झटपट बाद झाल्याने बटलरवरील दडपण वाढले होते. हार्दिकने त्याला ( ३९) बाद केले. हार्दिकने सॅमसन, बटलर यांच्यानंतर शिमरोन हेटमायरला ( ११) बाद केले. साई किशोरने RRच्या आऱ अश्विन ( ६) व ट्रेंट बोल्ट (११) यांना माघारी पाठवले. राजस्थानला ९ बाद १३० धावा करता आल्या. रियान परागने १५ धावा केल्या. साई किशोरने २ षटकांत २० धावांत २, राशिद खानने ४ षटकांत १८ धावांत १, तर शमी ( १-३३) व यश दयाल ( १-१८) यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
२०१७च्या आयपीएल फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने ८ बाद १२९ धावांचा यशस्वी बचाव केला होता. रायझिंग पुणे सुपरजायंट्सना त्यांनी ६ बाद १२८ धावांत रोखून १ धावेने सामना जिंकला होता. आज प्रत्युत्तरात ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात शुबमन गिलला जीवदान मिळाले, युजवेंद्र चहलने सोपा झेल सोडला. पण, पुढच्याच षटकात प्रसिद्ध कृष्णाने RR ला विकेट मिळवून देताना वृद्धीमान साहाला ( ५) बाद केले. बोल्टने तिसरे षटक निर्धाव फेकले. पाचव्या षटकात बोल्टने GT चा मॅथ्यू वेडला ( ८) रियान पराग करवी झेलबाद केले. पहिल्या ६ षटकांत गुजरातने २ बाद ३१ धावा केल्या. शुबमनला ( ० व १३) दोन जीवदान मिळाले. चहलने टाकलेल्या ८व्या षटकात शिमरोन हेटमायरने परतीचा कॅच घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. गुजरातला ५० धावा करण्यासाठी ९.२ षटकं लागली.
RRचा कर्णधार संजूने १० षटकं झाली तरी आर अश्विनची ४ षटकं राखून ठेवली होती. १२व्या षटकात अश्विन गोलंदाजीला आला. गुजरातला ५४ चेंडूंत ६९ धावा करायच्या होत्या. पण, हार्दिक पांड्याने अश्विनचे चौकार-षटकारांनी स्वागत करताना शुबमनसह ४३ चेंडूंत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. अश्विनच्या पहिल्याच षटकात १५ धावा आल्या. त्यामुळे चहलला पुन्हा गोलंदाजीवर आणले गेले आणि त्याने १४व्या षटकात हार्दिकला ( ३४) माघारी पाठवले. यशस्वी जैस्वालने स्लिपमध्ये सुरेख झेल टिपला. चहलने ( २७ ) यासह पुन्हा
आयपीएल २०२२मध्ये पर्पल कॅप नावावर केली. चहलने ४ षटकांत २० धावांत १, बोल्टने १४ धावांत १ विकेट घेतली. आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक २७ विकेट्स घेणारा चहल हा पहिलाच फिरकीपटू ठरला.
अश्विनला डेव्हिड मिलरनेही झोडून काढले अन् राजस्थानने सामन्यावरील पकड गमावली. गुजरातला २४ चेंडूंत २२ धावाच करायच्या होत्या आणि त्यांच्याकडे ७ विकेट्स हाताशी होत्या. डेव्हिड मिलरने ताबडतोड फटकेबाजी करताना गुजरातचा विजय पक्का केला. गिल ४५ आणि मिलर १९ चेंडूंत ३५ धावांवर नाबाद राहिले. गुजरातने ७ विकेट्स व ११ चेंडू राखून १३३ धावा केल्या.