Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिकला स्वत:चा खेळ चांगला कळू लागला आहे! कर्णधार रोहित शर्माकडून कौतुक

Hardik Pandya: ‘फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्याचा खेळ चांगल्याप्रकारे सुधारला आहे. दुखापतीतून सावरून त्याने जेव्हापासून पुनरागमन केले, तेव्हापासून तो स्वत:चा खेळ चांगल्याप्रकारे समजून घेत आहे,’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 12:07 IST

Open in App

दुबई : ‘फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्याचा खेळ चांगल्याप्रकारे सुधारला आहे. दुखापतीतून सावरून त्याने जेव्हापासून पुनरागमन केले, तेव्हापासून तो स्वत:चा खेळ चांगल्याप्रकारे समजून घेत आहे,’ असे सांगत भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने पाकिस्तानविरुद्ध सामनावीर ठरलेल्या हार्दिक पांड्याचे कौतुक केले. रविवारी झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या रोमांचक लढतीत भारताने हार्दिकच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ५ गड्यांनी बाजी मारली.हार्दिकने आधी गोलंदाजीत ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले आणि त्यानंतर १७ चेंडूंत नाबाद ३३ धावांचा निर्णायक तडाखा देत भारताला विजयी केले. सामन्यानंतर रोहितने सांगितले की, ‘जेव्हापासून हार्दिकने पुनरागमन केले आहे, त्याची कामगिरी शानदार ठरली आहे. संघाबाहेर असताना त्याने आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष देताना त्यासाठी खूप मेहनत घेतली. याचा त्याला फायदा झाला आणि आता तो १४० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतोय. तो किती चांगला फलंदाज आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तो आता संयमी आणि शांत झाला आहे. फलंदाजीत आणि गोलंदाजीत कशी कामगिरी करावी हे त्याला चांगल्याप्रकारे ठाऊक आहे.’ हार्दिकने रविवारी गोलंदाजीत वेगाने मारा केला. याबाबत रोहित म्हणाला की, ‘खरं म्हणजे तो खूप वेगाने गोलंदाजी करू शकतो. आखूड टप्प्याचे चेंडू टाकताना त्याचा हा वेग आम्ही पाहिला. स्वत:चा खेळ समजून घेतल्यानेच असे नियंत्रण मिळवता येतं आणि याबाबत तो शानदार आहे. तसेच, जेव्हा प्रत्येक षटकामागे १० धावांची गरज असते, तेव्हा अनेक जण दबावात येतात किंवा घाबरतात. पण, हार्दिक कोणत्याही क्षणी दबावात दिसला नाही.’ भारताच्या आघाडीच्या फळीबाबत रोहितने सांगितले की, ‘धावांचा पाठलाग करताना अर्धी षटके झाल्यानंतरही कोणत्याही परिस्थितीत आम्ही जिंकू शकतो, असा विश्वास होता. आम्हाला आमच्या कामगिरीवर पूर्ण विश्वास होता आणि जेव्हा असा विश्वास आपल्याला असतो, तेव्हा अशीच यशस्वी कामगिरी होते.’

टॅग्स :हार्दिक पांड्याभारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्मा
Open in App