भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून, ते २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळणार की नाही? यावरून वादविवाद सुरू आहेत. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही यावर ठोस उत्तर दिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याने टीकाकारांवर सडकून टीका करत दोघांनाही पाठिंबा दिला आहे.
हरभजन सिंहने कोहली आणि रोहित यांच्या सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. तो म्हणाला की, "विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची गणना जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. परंतु, सध्या त्यांच्यासोबत जे घडत आहे, ते योग्य नाही. या दोघांना संघातून बाजूला केले जात आहे का? या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही. मी स्वतः एक खेळाडू आहे, मी आता जे पाहत आहे, ते माझ्यासोबतही घडले आहे, संघातील अनेक खेळाडूंसोबत असे घडले आहे. परंतु, आम्ही याबद्दल बोलत नाही किंवा त्यावर चर्चा करत नाही," असे हरभजन सिंहने स्पष्ट केले.
रोहित शर्मा (वय, ३८) आणि विराट कोहली (वय, ३७) हे दोघेही आता केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. पुढील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत ते संघात राहतील की नाही? याबाबत अटकळ सुरू असताना हरभजन सिंहने टीकाकारांना चांगलेच फटकारले. तो म्हणाला की, कोहली आणि रोहित हे येणाऱ्या पिढीसाठी एक चांगले उदाहरण मांडत आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांना चांगली कामगिरी करताना पाहून मला खरोखर आनंद होत आहे. चॅम्पियन होण्यासाठी काय करावे लागते? हे ते दाखवत आहेत. परंतु, या दोघांच्या कारकिर्दीबद्दल असे लोक बोलत आहेत, ज्यांनी स्वतः काहीही साध्य केले नाही."
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नुकत्याच झालेल्या कामगिरीबद्दल हरभजनने आनंद व्यक्त केला. कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतके झळकावली आहेत (त्याच्या कारकिर्दीत सलग दोन शतके झळकावण्याची ही ११ वी वेळ आहे), तर रोहितने गेल्या चार डावांमध्ये दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.