Join us  

Rahul Dravid: 'या' दिग्गजाला प्रशिक्षक करून राहुल द्रविडचे हात बळकट करा, हरभजन सिंगची मागणी

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत हरभजन सिंगने मोठे विधान केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 3:01 PM

Open in App

नवी दिल्ली : दोन टी-20 विश्वचषक (T20 World Cup) आणि आशिया चषकामधील (Asia Cup 2022) निराशाजनक कामगिरीनंतर भारताच्या टी-20 संघावर टीका होत आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेत भारताने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरूद्ध 1-0 ने विजय मिळवला. अशातच आता भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्येही बदल करण्याची गरज असल्याचे मत भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केले आहे. 

माजी खेळाडू हरभजन सिंगने म्हटले, भारतीय संघात आशिष नेहरा सारख्या खेळाडूचा सपोर्ट स्टाफमध्ये समावेश करण्याची गरज आहे. नेहरा आल्यास भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे देखील काम सोपे होईल. एकूणच हरभजनने टी-20 संघाचा प्रशिक्षक म्हणून आशिष नेहराची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. भारतीय टी-20 संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नेहरा द्रविडपेक्षा अधिक योग्य असल्याचे त्याने अधिक म्हटले. 

नेहराला प्रशिक्षक केल्यास संघाची ताकद वाढेल पीटीआयशी संवाद साधताना हरभजनने म्हटले, "टी-20 फॉरमॅटमध्ये तुमच्याकडे आशिष नेहरासारखा कोणीतरी असू शकतो ज्याने नुकतीच खेळातून निवृत्ती घेतली आहे. त्याला हे फॉरमॅट अधिक चांगले माहीत आहे, राहुल द्रविडचा आदर राखून आम्ही इतकी वर्षे एकत्र खेळलो आहे. त्याच्याकडे प्रचंड ज्ञान आहे पण ते टी-20 क्रिकेट अवघड स्वरूप आहे. ज्याने अलीकडेच हा खेळ खेळला आहे तो टी-20 मध्ये प्रशिक्षकपदासाठी अधिक योग्य आहे. तुम्ही राहुलला टी-20 मधून काढून टाका असे मी म्हणत नाही. 2024 च्या विश्वचषकासाठी या संघाला तयार करण्यासाठी आशिष आणि राहुल एकत्र काम करू शकतात. असे केल्यास न्यूझीलंड दौऱ्याप्रमाणे ब्रेक घेऊ शकणार्‍या राहुल द्रविडसाठीही गोष्टी सोप्या होतील आणि आशिष त्याच्या अनुपस्थितीत काम करू शकेल." 

खरं तर भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. तिथे व्ही व्ही एस लक्ष्मण राहुल द्रविड यांच्या गैरहजेरीत प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळत आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नियमित प्रशिक्षक आणि कर्णधार यांना विश्रांती देण्यात आली आहे. यासह वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना देखील विश्रांती देण्यात आली आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडराहुल द्रविडहरभजन सिंगआशिष नेहराबीसीसीआय
Open in App