Harbhajan Singh, Punjab Flood Relief : भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने पंजाबमधीलपूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हरभजन हा आम आदमी पक्षाचा (आप) राज्यसभेचा खासदार आहे. हरभजनने मदतकार्यासाठी बोटी आणि रुग्णवाहिका पुरवल्या आहेत आणि निधी उभारून त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली आहे. हरभजनने त्याच्या खासदार निधीतून आठ स्टीमर बोटी मंजूर केल्या आहेत. तसेच स्वतःच्या पैशातून आणखी तीन बोटी दिल्या आहेत.
या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, हरभजनने ११ स्टीमर बोटी दिल्या आहेत. प्रत्येक बोटीची किंमत सुमारे ४.५० ते ५.५० लाख रुपये आहे. याशिवाय, हरभजनने गंभीर रुग्णांना जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी तीन रुग्णवाहिका देखील खरेदी केल्या आहेत.
निधीसाठी आवाहन
हरभजन सिंगने त्याच्या मित्रमंडळी आणि ओळखीच्या लोकांकडूनही मदत मागितली. त्याच्या आवाहनावर एका क्रीडा संघटनेने ३० लाख रुपये दिले आहेत, तर त्यांच्या दोन जवळच्या मित्रांनी अनुक्रमे १२ लाख आणि ६ लाख रुपये दिले आहेत. बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी भज्जीने सुमारे ५० लाख रुपये जमा केले आहेत. या रकमेतून लोकांना अविरत अन्नधान्य आणि औषधे पोहोचवली जात आहेत.
पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचले आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक बेघर झाले आहेत. पुरामुळे शेतकऱ्यांची पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकार आणि सामाजिक संघटना सतत मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. हरभजन सिंग स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गरज पडल्यास भविष्यातही सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन त्याने दिले आहे.