गुजरात टायटन्सचा स्टार ऑलराउंडर राशीद खानने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात अद्भुत झेल घेत ट्रेव्हिस हेडला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. राशीदचा हा झेल पाहून मैदानात उपस्थित असलेल्या खेळाडूंसह प्रेक्षकांनीही तोंडात बोट घातले. स्टार स्पोर्ट्सने राशीद खानच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या आगळ्या- वेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
अहमदाबाद येथील प्रतिष्ठित नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात काल (०२ मे २०२५) आयपीएल सामना खेळला गेला. दरम्यान, या सामन्यात हैदराबादच्या डावातील पाचव्या षटकात गुजरातचा प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करण्यासाठी आला. तर, ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे दोन्ही फलंदाज मैदानात होते. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ट्रेव्हिस हेडने डीप स्क्वेअर लेगकडे पुल शॉट मारला. चेंडू हवेत असताना राशीद खान वेगाने धावला आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवत झेल पकडला. राशीद खानच्या झेलमुळे गुजरातच्या संघाचा आत्मविश्वास आणखी वाढला. ट्रॅव्हिस हेडचा बाद होणे गुजरात टायटन्ससाठी एक महत्त्वाचा ब्रेकथ्रू ठरला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा हैदराबादच्या संघाचा निर्णय चुकला. या सामन्यात हैदराबादच्या संघाला ३८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत २२४ धावांचा डोंगर उभारला. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने ३८ चेंडूत ७६ धावा कुटल्या. त्याला जोस बटलरची उत्तम साथ मिळाली. बटलरने ३७ चेंडूत ६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ २० षटकांत फक्त १८६ धावाच करू शकला. हैदराबादकडून अभिषेक शर्माने ४१ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ७४ धावा केल्या. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांना धावा करता आल्या नाही. परिणामी, सामन्याचा निकाल गुजरातच्या बाजूने लागला.
Web Title: GT Vs SRH, IPL 2025: Rashid Khan Takes Phenomenal Running Catch To Dismiss Travis Head, Video Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.