ठळक मुद्देग्रेस हॅरिसची विक्रमी शतकी खेळीवेस्ट इंडिजच्या डिंड्रा डॉटीनचा विक्रम वाचला
लंडन : ग्रेस हॅरीसने महिला बिग बॅश लीगमध्ये बुधवारी विक्रमी खेळी केली. हॅरीसने बिग बॅश लीगमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा पराक्रम केला. ब्रिस्बन हिट संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हॅरीसने अवघ्या 42 चेंडूंत शतक पूर्ण केले. महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील हे दुसरे जलद शतक ठरले. वेस्ट इंडिजच्या डिंड्रा डॉटीनने 2010 च्या ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेत 38 चेंडूंत शतक झळकावले होते.
हॅरीसने नाबाद 101 धावांची खेळी करताना संघाला मेलबर्न स्टार्स संघावर दहा विकेट राखून विजय मिळवून दिला. तिच्या खेळीच्या जोरावर हिट संघाने 133 धावांचे लक्ष्य 10.5 षटकांत पूर्ण केले. हॅरीस 95 धावांवर खेळत होती आणि त्यावेळी संघाला विजयासाठी एकच धाव हवी होती. नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या बेथ मूनीने तिला खेळण्याची संधी दिली. हॅरिसने षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला आणि विक्रमी शतकही झळकावले.
तिने या खेळीत 6 षटकात व 13 चौकार लगावले. तिने अवघ्या 23 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि पुढील 50 धावा करण्यासाठी तिला 19 चेंडूंचा सामना करावा लागला. तिला 92 धावांवर जीवदान मिळाले होते आणि त्यानंतर तिने स्पर्धेतील दुसरे शतक झळकावले.
''मी बेसबॉलसारखा खेळ करण्याचा प्रयत्न केला,'' असे हॅरीसने सांगितले. याआधी बिग बॅश लीगमध्ये अॅश गार्डनरने 2017 मध्ये 47 चेंडूंत शतक झळकावले होते. हॅरीसने हा विक्रम आज मोडला.