‘नशीबाची साथ भारताच्या बाजूने असल्यामुळे रविवारी अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध दडपणाचा यशस्वी सामना केल्यास पहिला टी२० विश्वचषक जिंकू शकतो,’ असे मधल्या फळीतील भारताची अनुभवी फलंदाज वेदा कृष्णमूर्ती हिने म्हटले.
भारतीय संघाने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या आॅस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय मिळवला होता. २०१७ च्या ५० षटकांच्या विश्वचषकात उपविजेत्या भारतीय संघाची खेळाडू वेदा म्हणाली, ‘विश्वचषक जिंकण्यात येणाऱ्या अपयशाच्या वेदना मी अनुभवले आहे. यावेळी भाग्य भारताच्या बाजूने आहे. अनेक गोष्टी भारताच्या जमेच्या बाजू ठरत असल्याने विश्वचषक आपण जिंकू असे वाटते.’
ती पुढे म्हणाली, ‘अंतिम फेरीत गाठणे हे साखळी फेरीतील शानदार खेळाचे बक्षीस आहे. हवामानावर आमचे नियंत्रण नव्हते, मात्र सर्व सामने आम्ही जिंकलो. अंतिम फेरी पहिले लक्ष्य होते. आता अंतिम अडथळा पार करण्यासाठी दडपण झुगारून खेळावे लागेल.’