लॉर्ड्स - क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात येणा-या कसोटी सामन्यात घंटानाद करण्याचा मान मिळणे ही प्रत्येक क्रीडापटूंसाठी सन्मानच... लॉर्ड्सच्या बॉलर्स बार पेव्हेलियनमध्ये असलेली ही घंटा सकाळच्या सत्राच्या सुरूवातीला वाजवली जाते. ती वाजवण्याचा मान क्रिकेटपटू, व्यवस्थापक किंवा क्रीडा क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तीला दिला जातो. 2007पासून सुरू झालेल्या परंपरेत आतापर्यंत 6 भारतीय क्रिकेटपटूंना हा मान मिळाला आहे आणि त्यात आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्या नावाचा समावेश होणार आहे.
लॉर्ड स्टेडियमचे व्यवस्थापन पाहणा-या मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी ) क्रिकेटर किंवा व्यवस्थापकाला कसोटी सामन्यात घंटानाद करण्याचे निमंत्रण पाठवते. भारत आणि इंग्लंड यांच्यात 9 ऑगस्टला होणा-या कसोटी सामन्यासाठी भारतरत्न आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला एमसीसीतर्फे निमंत्रित करण्यात आले आहे. सचिनने एमसीसीचे निमंत्रण स्वीकारले आहे.
यापूर्वी भारताच्या सुनील गावस्कर ( 2007), मन्सुर अली खान पतौडी ( 2007), दीलीप वेंगसरकर (2011), सौरव गांगुली, राहुल द्रविड, कपिल देव ( सर्व 2014 ) यांना या मान मिळाला होता.