मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषकातील दुसरा सेमीफायनल सामना खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर काढले. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्राने केलेली भविष्यवाणी खरी ठरली. इंग्लंडने जसप्रीत बुमराहपासून अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे मॅकग्राने म्हटले होते आणि तोच इंग्लंडच्या पराभवाला कारणीभूत ठरला.
या सामन्यात जसप्रीत बुमराहने अत्यंत भेदक गोलंदाजी केली. कठीण परिस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासावर तो पूर्णपणे खरा उतरला. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या १८ चेंडूत ४५ धावांची गरज होती आणि मैदानावर जेकब बेथेल भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत होता. सॅम करनच्या साथीने बेथेल ज्या पद्धतीने खेळत होता, ते पाहता भारत हा सामना गमावतो की काय, अशी भीती चाहत्यांना वाटू लागली होती. मात्र, अशा मोक्याच्या क्षणी जसप्रीत बुमराहने आपल्या लौकिकाला साजेसा स्पेल टाकला.
बुमराहने इंग्लंडच्या डावातील १८ व्या षटकात अत्यंत टिच्चून मारा करत केवळ ६ धावा दिल्या आणि सामन्याचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवले. या षटकामुळे इंग्लंडवर प्रचंड दडपण आले, कारण शेवटच्या दोन षटकांत ३९ धावांचे लक्ष्य गाठणे कोणत्याही संघासाठी सोपे नाही,जेव्हा त्यांचे ५ महत्त्वाचे फलंदाज आधीच माघारी परतले होते. बुमराहच्या याच भेदक स्पेलमुळे इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावरून मागे फिरावे लागले.
चेन्नईतील एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मॅकग्रा म्हणाले होते की, "मला वाटते की जसप्रीत बुमराह हा मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे. अनेकदा मोठे खेळाडू दबावाच्या प्रसंगी डगमगतात, पण बुमराहला आव्हाने आवडतात. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा बुमराह स्वतःला सिद्ध करतो. उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात तो एकट्याच्या जोरावर सामना फिरवू शकतो, असा मला पूर्ण विश्वास आहे."
भारत vs इंग्लंड Semi-Final Match Highlights
मॅकग्राने असेही म्हटले होते की, "मोठ्या संघांना दबावात खेळायला आवडते. मी ज्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होतो, तेव्हा आम्हाला फक्त अंतिम फेरी गाठण्याची भीती वाटायची. एकदा का आम्ही तिथे पोहोचलो, की समोरचा संघ संपला असे आम्ही समजायचो. भारतीय संघही आता त्याच मानसिकतेत असून ते आव्हानांसाठी सज्ज झाला आहे."