Glenn Maxwell in Cricket Australia: यंदाच्या IPLमध्ये संधी न मिळालेल्या तडाखेबाज अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलला मोठा धक्का बसला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०२६-२७ या आगामी वर्षासाठी २१ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या यादीत ग्लेन मॅक्सवेलचे नाव नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. खराब फॉर्म आणि दुखापतींमुळे मॅक्सवेलला या करारातून बाहेर करण्यात आल्याचे समजते. तसेच, यामागे आणखीही एक खास कारण आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे ग्लेन मॅक्सवेलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर आता पूर्णविराम लागणार का, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.
मॅक्सवेल बाहेर का?
येत्या १२ महिन्यांत ऑस्ट्रेलियाला बांगलादेश, न्यूझीलंड, भारत आणि इंग्लंडविरुद्ध महत्त्वाच्या कसोटी मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे निवड समितीने कसोटी खेळणाऱ्या आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये उपलब्ध असणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. मॅक्सवेल २०१७ पासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. मॅक्सवेलने गेल्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तसेच २०२६ च्या टी२० विश्वचषकात त्याची कामगिरी समाधानकारक नव्हती. तो आयपीएल २०२६ चाही भाग नाही. ३७ वर्षांच्या मॅक्सवेलला आता भविष्यातील नियोजनाचा भाग मानले जात नसल्याचे या निर्णयावरून स्पष्ट होत आहे.
कुणाला वगळले?
मॅक्सवेलसोबतच युवा फलंदाज सॅम कोन्स्टास, वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन, लान्स मॉरिस, मॅट शॉर्ट आणि निवृत्त झालेला उस्मान ख्वाजा यांनाही या करारातून वगळण्यात आले आहे.
संधी मिळालेले नवे चेहरे
निवड समितीने युवा खेळाडूंना वाव दिला असून यामध्ये ब्रँडन डॉगेट (वेगवान गोलंदाज), जेक वेदराल्ड (ओपनर), टॉड मर्फी (बॅकअप स्पिनर) आणि बो वेबस्टर यांसारख्या खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान मिळाले आहे.
२०२६-२७ सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळालेले २१ खेळाडू
पॅट कमिन्स (कर्णधार), जेवियर बार्टलेट, स्कॉट बोलँड, अलेक्स कॅरी, ब्रँडन डॉगेट, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुह्नमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मायकल नेसर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, जेक वेदराल्ड, बो वेबस्टर आणि ॲडम झॅम्पा.