GLENN MAXWELL HITS A TON IN 41 BALLS - बिग बॅश लीगमध्ये बुधवारी ग्लेन मॅक्सवेलची आतषबाजी अनुभवायला मिळाली. मेलबर्न स्टार ( Melbourne Stars) संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मॅक्सवेलनं ४१ चेंडूंत शतक झळकावलं. BBLमध्ये १०० वा सामना खेळणाऱ्या मॅक्सवेलनं  स्पर्धेतील दुसरे जलद शतक झळकावण्याचा पराक्रम केला. हॉबर्ट हरिकेन्स ( Hobart Hurricanes) विरुद्धच्या या सामन्यात मॅक्सवेलनं तुफान फटकेबाजी केली. त्यानं असाच झंझावाती खेळ कायम राखताना दीडशतक पूर्ण केले. BBLच्या इतिहासात प्रथमच एकाच सामन्यात फलंदाजानं दीडशतकी खेळी केली. 
प्रथम फलंदाजीला आलेल्या मेलबर्न स्टार संघाला मॅक्सवेल व जोए क्लार्क यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७ षटकांत ९७ धावा चोपल्या. क्लार्क १८ चेंडूंत ३५ धावांवर बाद झाला. त्यानंतर निक लार्किन ( ४) हाही बाद झाला. पण, मार्कस स्टॉयनिसनं तिसऱ्या विकेटसाठी मॅक्सवेलला साथ दिली. मॅक्सवेलनं ४१ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि त्याच्या या शतकी खेळीत १४ चौकार व ३ षटकार अशा ७४ धावा या केवळ १७ चेंडूंत आले. त्यानं २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
मॅक्सवेलच्या पार्टीत स्टॉयनिसनंही हात धुतले. त्यानं २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यात ३ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता. मॅक्सवेलनं १४९ धावांचा पल्ला ओलांडताच BBLमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम त्यानं नावावर केला. मॅक्सवेलनं संदीप लामिचानेनं टाकलेल्या १८व्या षटकात २२ ( सलग पाच चौकार) धावा कुटल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५४ चेंडूंत नाबाद १३२ धावांची भागीदारी केली. 
मॅक्सवेल ६४ चेंडूंत १५४ धावांवर नाबाद राहिला. त्यानं २२ चौकार व ४ षटकार खेचून अवघ्या २६ चेंडूंत ११२ धावा जोडल्या. स्टॉयनिसनं ३१ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७५ धावा चोपल्या. मेलबर्न स्टारनं २ बाद २७३ धावांचा डोंगर उभा केला.