- हर्षा भोगले
अनेकांसारखे मी देखील शुभमान गिलबाबत ऐकले होते. त्याच्या बऱ्याच विशेषता कानावर होत्या. अंडर -१९ विश्वचषकात त्याच्या फलंदाजीची झलकही पाहिली. तो शानदार, सहज, संतुलित आणि नव्या संकल्पना राबविण्यात तरबेज मानला जातो. अन्य खेळाडूंना जे जमत नाही ते शुभमनसाठी अपेक्षेकृत सहज ठरताना दिसते. त्यामुळेच शुभमनच्या कामगिरीकडे लक्ष ठेवायलाच हवे.
केकेआरकडून तो सातव्या स्थानावर खेळायला आला. या स्थानावर फारशी संधी मिळत नाही पण १९ वर्षांच्या शुभमानने हे आव्हान दोन्ही हात पुढे करीत स्वीकारले.आरसीबीविरुद्ध अखेरच्या षटकात संघाला चार धावांची गरज होती त्या वेळी उमेश यादवच्या चेंडूवर त्याने मारलेला ‘कट शॉट’ सर्वांना प्रभावित करणारा ठरला.त्या चेंडूवर कट शॉट फार कठीण नव्हता; पण पूर्ण ताकदीनिशी तो शुभमनने खेळला, हे विशेष.
चेन्नईविरुद्ध शुभमानला चौथ्या स्थानावर खेळण्याची संधी मिळाली. विजेता संघ, अनुभवी गोलंदाज आणि विविधता असलेल्या गोलंदाजांविरुद्ध खेळणे हे दृश्य उत्कंठापूर्ण होते. तो फलंदाजीला आला त्या वेळी संघाने ४० धावात दोन फलंदाज गमविले होते. लवकरच ही स्थिती ४ बाद ९७ अशी झाली. आखेरच्या आठ षटकांत ८० धावांची गरज होती. गिलने त्याचवेळी ३६ चेंडूत ५७ धावा कुटल्या. दुसºया टोकावर दिनेश कार्तिक आपल्या शैलीत फलंदाजी करीत होता. गिल मात्र अखेरपर्यंत खेळपट्टीवर स्थिरावला. त्याच्या दोन शॉटमुळे मी फारच प्रभावित झालो. पहिला शॉट हा डावाच्या सुरुवातीला मारलेला पूल शॉट होता. चेंडूची उंची थोडी कमी आहे, हे लक्षात येताच त्याने स्क्वेअर लेगकडे चेंडू पूल केला. शिवाय अधिक धावांची गरज असताना त्याने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर उत्कृष्ट कव्हर ड्राईव्हचा फटका मारला. हे दोन्ही शॉट इतक्या सहजपणे आणि शांत डोक्याने मारलेले होते. एखादा दिग्गज आणि मुरब्बी फलंदाज खेळत आहे, असा भास होत होता.
आता शुभमनकडून अपेक्षा वाढतील. अनेकदा त्याचा उल्लेख होईल. आयपीएलमध्ये पहिल्यांदा मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले आहे. ही लोकप्रियता डोक्यात जाणार नाही, याची त्याला काळजी घ्यावी लागणार आहे. लोकप्रियता टिकविली तर मात्र शुभमन दीर्घकाळ चमकत राहील, यात शंका नाही.
(टीसीएम)