Join us  

‘दादा’साठी जीसीएचीही दमदार ‘बॅटिंग!’

राज्य संघटना पाठीशी : २३ रोजी होणार अधिकृत घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 8:12 PM

Open in App

सचिन कोरडे : संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड जवळपास निश्चित झाली आहे. सौरवला अध्यक्षपदावर आणण्यासाठी देशातील जवळपास सर्वच राज्य संघटनांनी पुढाकार घेतला. त्यात गोवा क्रिकेट संघटनेचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरले. ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरवसाठी जीसीएने दमदारपणे ‘बॅटिंग’ केली. कोणत्याही स्थितीत एखाद्या खेळाडूलाच या मोठ्या पदावर संधी मिळावी, असा अट्टहास जीसीएचा होता. त्यामुळेच गेल्या तीन-चार दिवसांपासून जीसीएचे अध्यक्ष मुंबईत तळ ठोकून होते. जीसीएच्या योगदानाचे गांगुलीने स्वत: कौतुक केले आणि पदाधिकाºयांचे आभारही मानले. 

बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीने सोमवारी अर्ज भरला. सौरवच्या नावाची चर्चा होतीच. त्यावर शिक्कामोर्तब झाले. राज्य संघटनांचाही सौरवसोबत संपर्क होता. देशासाठी एक खेळाडू म्हणून अविस्मरणीय योगदान देणाºया सौरवसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यात आले होते. एन. श्रीनिवासन, राजीव शुक्ला आणि अनुराग ठाकूर यांनी विविध संघटनांच्या अध्यक्षांसोबत मुबंईत रविवारी रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. या बैठकीत सौरवला बिनविरोध निवडून आणण्याचे ठरविण्यात आले. संघटनांनी सोमवारी सौरवच्या नावाला अनुमोदन दिले. यामध्ये गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांचाही समावेश आहे. सूरज यांनी सौरवला अनुमोदन देणारा अर्ज भरला. या वेळी साक्षीदार म्हणून अविषेक दालमिया उपस्थित होते. यासंदर्भात, जीसीएच्या एका पदाधिकाºयाने सांगितले की, सौरव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. केवळ त्यांच्या नावाची औपचारिकता बाकी आहे. त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज भरलेला नाही. त्यामुळे त्यांचे बिनविरोध निवडून येणे निश्चित आहे. सौरव यांना जवळपास १० महिन्यांचा कालावधी मिळेल. सप्टेंबर २०२० पर्यंत ते अध्यक्षपदावर असतील. भारतीय क्रिकेट व्यवस्थापनातील त्यांची ही ‘एन्ट्री’ कलाटणी देणारी ठरेल. दरम्यान, बीसीसीआयच्या व्यवस्थापकीय समितीत ७ पदांचा समावेश आहे. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव, खजिनदार, सदस्य आणि कार्यकारी सदस्य यांचा समावेश आहे.

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआय