भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याला दक्षिण आफ्रिकेसोबतची दुसरीही टेस्ट हरल्यामुळे मोठ्या वादाला सामोरे जावे लागत आहे. नाराज भारतीय चाहत्यांनी भर स्टेडिअममधून गंभीर हाय हायच्या घोषणा दिल्या होत्या. तसेच सोशल मीड़ियावर गंभीरचा राजीनामा घेण्याचीही मागणी जोर धरू लागली होती. यावर गंभीरने बीसीसीआय काय तो निर्णय घेईल असे म्हटले होते. आता बीसीसीआयच गंभीरवर नाराज असल्याचे समोर येत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानला आणि संघ व्यवस्थापनाला गंभीरने एक सल्ला दिला होता. २०२६ मध्ये होणाऱ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघावर असणाऱ्या अतिरीक्त दबावाबाबत गंभीर याने चिंता व्यक्त केली होती. भारतीय क्रिकेटमध्ये यश मिळवल्यानंतरही खेळाडू आणि व्यवस्थापनावर नेहमीच 'परिपूर्ण कामगिरी' करण्यासाठी जो दबाव असतो, तो २०२६ च्या विश्वचषकात भारताला अडचणीत आणू शकतो, असे गंभीर म्हणाला होता.
पराभवासाठी सामूहिक जबाबदारी घेण्याची भूमिका त्याने मांडली होती. कोलकाता कसोटी सामन्यानंतर गंभीरने खेळपट्टीवरही टिप्पणी केली होती. या सगळ्या गोष्टी बीसीसीआयच्या धोरणांशी विसंगत असल्याचे सांगितले जात आहे. बीसीसीआय गंभीर यांच्या विधाने आणि एकंदर वर्तणुकीवर समाधानी नाही, ज्यामुळे मैदानावरील पराभवाबरोबरच मैदानाबाहेरचा तणाव देखील वाढला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत झालेल्या पराभवानंतर गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाची भूमिका अधिकच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या बीसीसीआय गंभीर यांना पूर्ण पाठिंबा देत असले तरी, प्रशिक्षकाच्या पदावर राहणे केवळ कामगिरीवर आणि बोर्डासोबतच्या सुसंवादावर अवलंबून असणार आहे. आगामी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाची कामगिरी खराब झाल्यास, त्याची प्रशिक्षकपदाची खुर्ची धोक्यात येऊ शकते.