Join us  

गौतम गंभीरनं पद्मश्री पुरस्कारानंतर केलं पत्नीला ट्रोल, पाहा गमतीदार ट्विट

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरला शनिवारी पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 3:14 PM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरला शनिवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. सोशल मीडियावर सामाजिक व राजकीय मुद्यांवर सडकून टीका करणाऱ्या गंभीरनं पुरस्कारानंतर ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. त्याने पत्नीसह फोटो शेअर करताना सर्वांचे आभार मानले, परंतु या ट्विटमध्ये त्याने आपल्या टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले. 

तो म्हणाला,''हा पुरस्कार भारतीय क्रिकेटला समर्थन करणाऱ्या आणि टीका करणाऱ्या प्रत्येकाचा आहे. दोघांनी माझ्या आयुष्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. माझ्या यशात नेमका कोणाचा किती वाटा हे वेळ आल्यावर सांगेन.'' त्यानंतर गंभीरने पत्नी नताशासोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्याखाली गमतीदार मॅसेज लिहिला. तो म्हणाला,''जोरदार धमाक्यासह वास्तविक आयुष्यात पुनरागमन. माझ्या श्रीमतीसह पद्मश्री. आमच्या पाठीमागे दिसत असलेल्या तोफेला घाबरू नका, घरी माझ्यावर रोजच फायरिंग होते.'' गंभीरसह  भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्यासह तिरंदाज एल बोम्बल्या देवी आणि बास्केटबॉलपटू प्रशांती सिंग यांनाही शनिवारी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. याआधी टेबलटेनिसपटू शरथ कमल, कुस्तीपटू बजरंग पुनिया, बुद्धिबळपटू हरिका द्रोणावली आणि कबड्डीपटू अजय ठाकूर यांनाही हा प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

गंभीरने 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिेकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या नावावर 10000 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता.   

टॅग्स :गौतम गंभीरसुनील छेत्रीराष्ट्राध्यक्षरामनाथ कोविंद