Join us  

IM vs WG Highlights: गौतम गंभीरची एकतर्फी झुंज अयशस्वी! तोंडचा घास निसटला; शेवटच्या चेंडूवर भारताचा पराभव

Legends League Cricket: सध्या लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 10:39 AM

Open in App

India Maharajas vs World Giants । नवी दिल्ली : सध्या लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वातील इंडिया महाराजाच्या संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वर्ल्ड जायंट्सविरूद्ध इंडिया महाराजाच्या संघाचा 2 धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना वर्ल्ड जायंट्सने 8 गड्यांच्या मोबदल्यात 166 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंडिया महाराजाने देखील शानदार खेळी केली मात्र संघाला पराभव स्वीकारावा लागला. 167 धावांचे आव्हान गाठताना गौतम गंभीरचा संघ 5 गडी गमावून केवळ 164 धावा करू शकला.

तत्पुर्वी, वर्ल्ड जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ख्रिस गेल 4 धावा करून बाद झाला, मात्र कर्णधार आरोन फिंचने चमकदार फलंदाजी करताना 31 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय शेन वॉटसननेही 32 चेंडूत 55 धावा करून संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. मात्र, इतर सर्व फलंदाज एकामागून एक बाद होत गेले आणि संघाची धावसंख्या 8 बाद 166 धावांपर्यंत पोहोचली. इंडिया महाराजाकडून हरभजन सिंगने सर्वाधिक 4 बळी घेतले. त्याच्याशिवाय प्रवीण तांबेनेही 2 बळी घेत प्रतिस्पर्धी संघाला 166 धावांपर्यंत रोखले. 

गौतम गंभीरची एकतर्फी झुंज अयशस्वी वर्ल्ड जायंट्सने दिलेल्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिया महाराजाने शानदार सुरूवात केली. रॉबिन उथप्पा आणि गौतम गंभीर यांनी इंडिया महाराजाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या बळीसाठी 65 धावांची भागीदारी नोंदवली. उथप्पाने 21 चेंडूंचा सामना करत 29 धावा केल्या, तर मुरली विजय 11 धावा करून बाद झाला. गौतम गंभीरने पुन्हा एकदा कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळत सलग दुसऱ्यांदा अर्धशतक ठोकले. त्याने 42 चेंडूत 68 धावांची अर्धशतकी खेळी केली. याशिवाय सुरेश रैनाने 19 धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला अपयश आले. मोहम्मद कैफ शेवटपर्यंत टिकून राहिला आणि त्याने 17 चेंडूत 21 धावा केल्या. खरं तर इंडिया महाराजाला शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची गरज होती पण या धावा होऊ शकल्या नाहीत. अखेर इंडिया महाराजाचा संघ 20 षटकांत 5 बाद 164 धावा करू शकला. वर्ल्ड जायंट्ससाठी रिकार्डो पॉवेलने सर्वाधिक 2 बळी पटकावले. 

वर्ल्ड जायंट्सचा संघ - आरोन फिंच (कर्णधार), ख्रिस गेल, शेन वॉटसन, जॅक कॅलिस, रॉस टेलर, केविन ओ ब्रायन, मॉर्न व्हॅन विक (यष्टीरक्षक), टिनो बेस्ट, ब्रेट ली, मॉन्टी पानेसर, ख्रिस मपोफू. 

इंडिया महाराजाचा संघ - गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा (यष्टीरक्षक), मुरली विजय, सुरेश रैना, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, इरफान पठाण, हरभजन सिंग, प्रज्ञान ओझा, अशोक दिंडा.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

टॅग्स :गौतम गंभीरहरभजन सिंगअ‍ॅरॉन फिंचसुरेश रैनाख्रिस गेल
Open in App