Join us  

गौतम गंभीर असे करूच शकत नाही, लक्ष्मण, हरभजनसिंग यांचा पाठिंबा

पूर्व दिल्लीची आपची उमेदवार आतिशी मालेर्ना हिच्यासंदर्भात आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूराची पत्रक वाटपप्रकरणी वादात अडकलेला भाजप उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याचा बचाव करण्यासाठी माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि हरभजनसिंग पुढे आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 3:57 AM

Open in App

नवी दिल्ली - पूर्व दिल्लीची आपची उमेदवार आतिशी मालेर्ना हिच्यासंदर्भात आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूराची पत्रक वाटपप्रकरणी वादात अडकलेला भाजप उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याचा बचाव करण्यासाठी माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि हरभजनसिंग पुढे आले. ‘गौतम गंभीर अशी टीका कधीच करणार नाही, एक माणूस म्हणून तो या सर्वांपलिकडे आहे,’ या शब्दांत या दोन्ही दिग्गजांनी गंभीरचे समर्थन केले.गुरुवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया आणि पूर्व दिल्लीतील आपच्या उमेदवार आतिशी मालेर्ना यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीरवर आरोप केला होता. या पत्रकार परिषदेत अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके गौतम गंभीरच्या कार्यकर्त्यांनी वाटल्याचा आरोप आतिशीने केला. यानंतर गौतम गंभीरने हा आरोप फेटाळला आणि आतिशी मालेर्नाला अब्रूनुकसानीची नोटीस बजावली.‘खालच्या पातळीवरची टीका मी कधीच करणार नाही,’ अशी स्पष्टोक्ती गंभीरने दिली. हरभजनसिंग यानेही टिष्ट्वट करून गंभीरला पाठिंबा दिला. ‘गंभीरला मी ओळखतो. तो असे विधान कधीच करणार नाही. तो जिंकेल की हरेल हा वेगळा मुद्दा आहे. पण तो या सर्वांच्या पलिकडचा व्यक्ती आहे,’ असे भज्जीने लिहिले.लक्ष्मणने गंभीरचे समर्थन केले. ‘मी गौतम गंभीरला गेल्या २० वर्षांपासून ओळखतो. त्याचे चारित्र्य, स्वभाव ओळखून असल्याने मी खात्रीने सांगू शकतो. या आरोपांमुळे मला धक्का बसला.’ असे लक्ष्मणने सांगितले. दरम्यान गंभीरने आतिशी व केजरीवाल यांना अब्रूनुकसानीची नोटीस बजावली. आरोप सिद्ध झाल्यास जनतेसमोर जाहीर फाशी घेईन, अशी घोषणाही गंभीरने केली.

टॅग्स :गौतम गंभीरलोकसभा निवडणूकदिल्ली लोकसभा निवडणूक 2019