आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने युथ वनडे आणि युथ टेस्ट अशा दोन्ही मालिकांमध्ये आपल्या फलंदाजीने जबरदस्त छाप पाडली.त्याने दोन्ही मालिकांमधील सहा डावांमध्ये फलंदाजी करताना अंदाजे ४२ च्या सरासरीने एकूण २५७ धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने दोन्ही मालिकांमध्ये एकूण १८ षटकार मारले आणि युवा कसोटीत शतकही झळकावले. एका १४ वर्षाच्या फलंदाजाकडून अशा प्रकारची आक्रमक फलंदाजी पाहिल्यावर कोणत्याही युवा गोलंदाजाच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो.
दरम्यान, वैभव सुर्यवंशीने युथ वनडे मालिकेतील तीन डावात ४१.३३ सरासरीने आणि ११२.७२ , स्ट्राइक रेटने १२४ धावा केल्या, ज्यात १२ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश आहे. तर, युथ टेस्टच्या ३ डावात त्याने ४४.३३ सरासरीने १३३ धावा केल्या. मालिकेत त्याने एका शतकासह ११ चौकार आणि ९ षटकार मारले आहेत.
आयपीएल २०२५ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या शतकामुळे त्याच्या नावाची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. वैभवने आतापर्यंत त्याच्या युवा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण तीन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. आगामी भारतीय स्थानिक क्रिकेट हंगाम वैभवसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि रणजी करंडकातील त्याच्या कामगिरीकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे आणि निवड समितीचे लक्ष लागून राहील.