लंडन : एमसीसी विश्व क्रिकेट समितीने कसोटीत चुरस आणण्याच्या हेतूने काही प्रस्ताव दिले आहेत. त्यात वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ‘शॉट क्लॉक’ लावणे, विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मानकानुसार चेंडूचा वापर आणि नो बॉलसाठी ‘फ्री हिट’ अशा शिफारशींचा समावेश आहे.
इंग्लंडचे माजी कर्णधार माईक गॅटिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मागील आठवड्यात बंगळुरु येथे झालेल्या बैठकीत कसोटी क्रिकेटमध्ये काही बदल सुचविले. या समितीत माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा समावेश आहे. हे प्रस्ताव मेरिलबोन क्रिकेट क्लबने(एमसीसी) मंगळवारी रात्री स्वत:च्या संकेतस्थळावर टाकले.
कसोटी क्रिकेटमध्ये संथ गोलंदाजी नेहमीच टाकली जाते. त्यामुळे चाहते खेळापासून दुरावत आहेत. त्यामुळेच शॉट क्लॉक’ कल्पना पुढे आली. इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंडआणि द. आफ्रिकेतील चाहत्यांना कसोटीत रोडावणाऱ्या प्रेक्षक क्षमतेबाबत विचारले असता २५ टक्के चाहत्यांनी वेळखाऊ गोलंदाजीचे कारण दिले.
या देशांचे फिरकीपटू फारच कमी षटके गोलंदाजी करतात. दिवसभरात ९० षटके कधीकधीच फेकली जातात.अतिरिक्त ३० मिनिटे देऊनही अनेकदा ९० षटके पूर्ण होत नाहीत. याशिवाय डीआरएसमधील वेळखाऊ प्रक्रिया याला जबाबादार आहे. खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी काही नवे करावे लागेल, असे समितीला वाटते. (वृत्तसंस्था)