Fox in The ground During The Hundred Match : 'कोल्होबा' हा एक जंगली प्राणी आहे. जो बालगीत अन् कथांमधून चांगलाच लोकप्रिय झालाय. चलाखी आणि फसवणूकीच्या स्वभाव गुणधर्मामुळे या प्राण्याला धूर्त असा टॅगही लागलाय. आता छान छान गोष्टीच्या पुस्तकात अनेक कथा रंगवलेल्या कोल्होबाची एक नवी अन् आश्चर्यचकित गोष्ट चर्चेत आलीये. एक कोल्हा थेट क्रिकेटची मॅच सुरु असताना मैदानात घुसल्याचे पाहायला मिळाले. मैदानात त्याने घेतलेली सुसाट धाव अन् त्यामुळे सामन्यात आलेला व्यत्यय हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
क्रिकेटच्या पंढरीत धूर्त कोल्होबाची एन्ट्री, अन्...
इंग्लंडच्या मैदानात द हंड्रेड टूर्नामेंट सुरु आहे. पाचव्या हंगामातील या स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑगस्ट रोजी क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात लंडन स्पिरीट विरुद्ध ओव्हल इनविंसिबल्स यांच्यातील सामना खेळवण्यात आला. हा सामना सुरु असताना अचानक एक कोल्हा मैदानात घुसला अन् त्यामुळे खेळ काही वेळासाठी थांबवण्याची वेळ आली.
कोल्होबाचा नवा चॅप्टर, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल
लॉर्ड्सच्या मैदानात घुसलेला कोल्हा जवळपास एक मिनिट मैदानात वेगाने धावताना दिसला. चालू मॅचमध्ये अचानक झालेले कोल्होबाची एन्ट्रीमुळे मैदानातील खेळाडूंसह सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना हसू अनावर झाले. खेळात काही वेळाचा व्यत्यय निर्माण केल्यावर हा कोल्होबा ग्राउंड्समन त्याला पकडण्याआधी स्वत:हून मैदानाबाहेर निघून गेल्याचे पाहायला मिळाले. स्काय स्पोर्ट्सनं आपल्या अधिकृत अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला असून कोल्होबाचा हा नवा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
गत चॅम्पियन ओव्हल इनविंसिबल्सनं जिंकली मॅच
सामन्याबद्दल बोलायचं तर, द हंड्रेड २०२५ च्या पहिल्या सामन्यात लंडन स्पिरिट संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ९४ चेंडूत ८० धावा केल्या होत्या. ओव्हलच्या संघाकडून राशीद खान आणि ऑलराउंडर सॅम कुरेन या दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. धावांचा पाठलाग करताना ओव्हल इनविंसिबल्स संघाने ६९ चेंडूत ६ विकेट्स राखून सामना जिंकला. सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या राशीद खानने सामनावीर पुरस्कार पटकवला.