Join us
Daily Top 2Weekly Top 5

आज चौथा टी-२० सामना : टीम इंडियाला फिरकी गोलंदाजांकडून अपेक्षा, विजयी घोडदौड कायम राखणार

Ind Vs NZ 4th T20: फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीत वर्चस्व गाजविणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पाचपैकी सलग तीन विजयांसह मालिका खिशात घातली; त्याच वेळी आज बुधवारी होणाऱ्या चौथ्या लढतीत फिरकी गोलंदाजांकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 08:38 IST

Open in App

विशाखापट्टणम - फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीत वर्चस्व गाजविणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पाचपैकी सलग तीन विजयांसह मालिका खिशात घातली; त्याच वेळी आज बुधवारी होणाऱ्या चौथ्या लढतीत फिरकी गोलंदाजांकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत. वर्चस्व गाजविण्याच्या दृष्टीने चौथा सामनयात विजयाच्या निर्धारासह यजमान संघ खेळणार आहे.

दोन प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती अपेक्षेनुसार कामगिरी करू शकले नाहीत. कुलदीपने दोन सामन्यांत केवळ दोन बळी घेतले असून, त्याने षटकामागे साडेनऊ धावा मोजल्या. तिसऱ्या सामन्यात कुलदीपने तीन महागडी षटके टाकून ३२ धावा दिल्या होत्या. वनडे मालिकेतही कुलदीपची कामगिरी समाधानकारक नव्हती. त्याने तीन सामन्यांत तीन बळी घेतले आणि प्रतिषटक ७.२८ धावा दिल्या.

चक्रवर्तीला मागच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली. पहिल्या दोन सामन्यांत त्याच्या गोलंदाजीत अपेक्षित धार दिसली नव्हती. या पार्श्वभूमीवर भारत चौथ्या सामन्यात बिश्नोई (गुवाहाटी येथे १८ धावांत दोन बळी) यालाच संघात कायम ठेवायचे की कुलदीपला विश्रांती देऊन त्याच्या जागी चक्रवर्तीला पुन्हा संधी द्यायची, याचा विचार करणार आहे.

न्यूझीलंडने लय गमावलीवनडे मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडला टी-२०त विजयी लय कायम राखता आलेली नाही. त्यांचे फलंदाजही क्वचितच चमकले, पण गोलंदाज भारतीय फलंदाजांच्या आक्रमकतेला रोखण्यात अपयशी ठरले. जॅकब डफी, मॅट हेन्री, काइल जेमिसन, मिचेल सँटनर आणि ईश सोढी यांना भारतीय फलंदाजांनी चांगलाच चोप दिला.

अक्षर पटेल परतणार...अष्टपैलू अक्षर पटेलच्या तंदुरुस्तीवरही भारताचे लक्ष असेल, कारण बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो नागपूरमधील पहिल्या सामन्यानंतर खेळू शकलेला नाही.विश्वचषकापूर्वी गोलंदाजी भक्कम करण्याचा भारताचा प्रयत्न आहे; मात्र फलंदाजीमध्ये सध्या त्याला प्रतिस्पर्धी दिसत नाही. या मालिकेत भारतीय फलंदाजांनी स्फोटक कामगिरी केली आहे.अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या शानदार फलंदाजीमुळे संघाने शानदार विजय नोंदविले.अभिषेकाने ३०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने, तर सूर्यकुमार आणि किशन यांनी जवळपास २३० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.मागच्या दोन सामन्यांत एकूण ३६३ धावांचा पाठलाग भारतीय फलंदाजांनी केवळ २५.२ षटकांत केला यावरून आक्रमकता अधोरेखित होते.

संजू सॅमसनचे काय?खेळपट्टीचे स्वरूप आणि दवबिंदूंचा परिणाम लक्षात घेता येथेही नाणेफेक महत्त्वपूर्ण असेल. भारतासाठी चिंतेचा विषय म्हणजे संजू सॅमसनचा खराब फॉर्म. तीन सामन्यांत त्याने ५.३३ च्या सरासरीने केवळ १६ धावा केल्या असून, त्याच्या खेळण्याविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. तिलक वर्मा दुखापतीमुळे बाहेर असल्याने संघ व्यवस्थापन संजूला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी देऊ शकते. त्याला तिसऱ्या क्रमांकावरही उतरवण्याचा विचार होऊ शकतो. तसे झाल्यास अभिषेकसोबत किशन सलामीला येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : India vs New Zealand: Spinners key in fourth T20

Web Summary : India eyes series dominance, expecting spinners to perform better in the fourth T20 against New Zealand. Focus is on Kuldeep and Chakaravarthy's form. New Zealand seeks to regain momentum after losing the series. Sanju Samson's form is a concern.
टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2026