इंदूर : भारतीय कर्णधार विराट कोहलीसह अनेक अव्वल खेळाडूंनी टीका केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) क्रिकेट समिती मार्चमध्ये चारदिवसीय कसोटी प्रस्तावावर चर्चा करणार आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीचे प्रमुख माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबले यांनी सांगितले की, ‘२७ ते ३१ मार्च या दरम्यान दुबईत आयसीसीच्या पुढील फेरीच्या बैठकीत यावर चर्चा होईल.’
कुंबळे म्हणाले, ‘मी समितीचा सदस्य असल्याने सध्यातरी याबाबत माझे मत व्यक्त करणार नाही. आम्ही बैठकीत यावर चर्चा करून तुम्हाला सांगू.’ अँड्य्रू स्ट्रॉस, राहुल द्रविड, माहेला जयवर्धने व शॉन पोलाक यांच्यासारख्या माजी खेळाडूंचा क्रिकेट समितीत समावेश आहे. हा प्रस्ताव २०२३ ते २०३१ च्या सत्रासाठी ठेवण्यात आला आहे, पण अनेक दिग्गजांनी यावर टीका केली आहे.
कोहलीने या मुद्यावर म्हटले होते की, ‘माझ्या मते यावर कुठलीही तडजोड व्हायला नको. जसे मी सांगितले की, दिवस-रात्र कसोटी व्यावसायीकरणाच्या दिशेने उचलले एक पाऊल आहे. त्यासाठी रोमांचकता निर्माण करणे वेगळी बाब आहे, पण अधिक बदल करता येणार नाही. माझ्या मते हा विचार योग्य नाही. त्यानंतर तुम्ही तीन दिवसांच्या कसोटीबाबत चर्चा कराल.’