Join us  

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू वर्ल्ड कप साठी इंग्लंडला मदत करणार; सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत

पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 9:31 PM

Open in App

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग राहिलेला किरॉन पोलार्ड आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी पोलार्डची इंग्लंडच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने रविवारी याची घोषणा केली. पोलार्डने एप्रिल २०२२ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २०१२ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा तो भाग होता. पोलार्डने ६३ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे नेतृत्व केले आहे. त्याने १०१ सामन्यांत १५६९ धावा केल्या असून ४२ बळी घेतले  आहेत. 

पोलार्ड रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग राहिला आहे. मुंबईने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला असून यामध्ये अष्टपैलू पोलार्डची महत्त्वाची भूमिका राहिली. पोलार्ड सध्या मुंबई इंडियन्सचा भाग नसला तरी तो अजूनही फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. अलीकडेच त्याने त्रिनबागो नाईट रायडर्सला कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या अंतिम फेरीत नेले होते.

आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे गोलंदाजांना घाम फोडणारा पोलार्ड ट्वेंटी-२० क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासोबतच्या वादामुळे त्याने आपल्या कारकिर्दीच्या शेवटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. परंतु, जगभरातील ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळणे सुरूच ठेवले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघातून बाहेर पडल्यानंतर पोलार्ड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून १८९ सामन्यांत ३४१२ धावा केल्या आहेत आणि ६९ विकेट्स घेतल्या आहेत. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024किरॉन पोलार्डवेस्ट इंडिजइंग्लंडमुंबई इंडियन्स